रमजानमध्ये भारनियमन बंद करा!

By Admin | Updated: July 15, 2014 01:15 IST2014-07-15T01:09:57+5:302014-07-15T01:15:29+5:30

रमजान महिन्यात करण्यात येणारे भारनियमन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या संदर्भात त्यांनी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना निवेदन देऊन चर्चा केली.

Turn off the weightage in Ramadan! | रमजानमध्ये भारनियमन बंद करा!

रमजानमध्ये भारनियमन बंद करा!

विद्युत भवनात बैठक : चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
नागपूर : रमजान महिन्यात करण्यात येणारे भारनियमन पूर्णपणे बंद करावे, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या संदर्भात त्यांनी राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांना निवेदन देऊन चर्चा केली.
नागपूर येथील विद्युत भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात आ. बावनकुळे यांनी सदर मागणी केली. याविषयी आ. बावनकुळे यांनी सांगितले की, रमजान महिन्यात सकाळ व सायंकाळी मोठ्या प्रमाणात भारनियमन केले जात आहे. या महिन्यात पहाटे सेहरी आणि सायंकाळी इफ्तारचे आयोजन केले जाते.
या काळातील भारनियमनामुळे मुस्लीम बांधवांना त्रास सहन करावा लागतो. नागपूर, कामठी व मौदा तालुक्यात वीज बिल स्वीकारण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यासाठी हे काम स्थानिक पतसंस्थांना देण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. या संदर्भात लवकरच निर्णय घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येणार असल्याचे राजेंद्र मुळक यांनी या बैठकीत सांगितले.
महावितरणचे मुख्य अभियंता मोहन झोडे यांनी वादळामुळे वीज वाहिन्यांचे झालेले नुकसान, त्यानंतर करण्यात आलेली दुरुस्तीची कामे, वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीची योजनेंतर्गत करावयाची कामे, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर, विभागनिहाय पथदिवे, कृषिपंप, ऊर्जीकरण, भारनियमन आदी बाबींची विस्तृत आढावा घेतला. त्यावर कोसळेले विजेचे खांब उभारण्याची प्रलंबित कामे सुरू करण्याचे निर्देश राजेंद्र मुळक यांनी दिले. ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्याची कामे हाती घेण्यात यावी, यासाठी लागणाऱ्या निधीकरिता जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करणे, कृषी संजीवनी योजना, ट्रान्सफॉर्मर बदलविण्यासाठी ८० टक्के रक्कम भरण्याची अट शिथिल करणे यासह अन्य बाबींचा राज्यमंत्री मुळक यांनी आढावा घेतला.
या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य शिवकुमार यादव, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पुष्पा कारगावकर, अभियंता अरविंद भादीकर, सुरेश मडावी, सुहास रंगारी, चंद्रकांत खंडाळकर, आर. एन. गायकवाड, सुहस मैत्रे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Turn off the weightage in Ramadan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.