गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 01:20 PM2023-12-21T13:20:04+5:302023-12-21T13:21:33+5:30

डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. 

true glory of goa the sahitya akademi award for dr prakash paryekar story book | गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार

गोव्याचा यथार्थ गौरव; डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार

मराठी व कोंकणी या गोव्यातील भाषाभगिनी आहेत. पोर्तुगीज काळात दोन्ही भाषांना गोव्यात खडतर स्थितीला सामोरे जावे लागले, साहित्य निर्मिती, भाषा सेवा यावर त्या काळात मर्यादा आल्या होत्या, गोमंतकीयांनी ज्याप्रमाणे आपला धर्म, देव यांचे रक्षण करण्यासाठी पोर्तुगीजांचा त्रास सहन केला, त्याचप्रमाणे आपली भाषा व भारतीय संस्कृती सांभाळून ठेवण्यासाठीही संघर्ष केला. पोर्तुगीज राजवटीत मराठी भाषेची सेवा करण्याच्या कामात महाराष्ट्रानेही गोव्याला मदत केली. भारतीय संस्कृतीशी आपली नाळ बांधून ठेवण्यासाठी, ती भक्कम ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी मराठीच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आधार घेतला होता. म्हणूनच त्या काळातदेखील अत्यंत प्रतिकूल स्थितीत गोव्यात मराठी प्राथमिक शाळा लोकच सुरू करत होते.

देवनागरी लिपीतून कोकणी साहित्य निर्मिती करणारी पिढी गोव्यात निर्माण झाली, शणै गोंयबाब यांना दैवत मानून गोव्यातील अनेक युवा- युवतींनी कोकणीतूनही गेल्या चाळीस वर्षात विपुल साहित्य निर्मिती केली आहे. गोव्यात कोकणीला दोन ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले, जगातील कुणाही साहित्यप्रेमीचे डोळे दिपून जावेत अशी ही घटना आहे काल डॉ. प्रकाश पर्येकर यांच्या वर्सल कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. 

साहित्य अकादमीचे पुरस्कार मिळालेले गोव्यातील सगळेच कोकणी लेखक किंवा कवी दमदार आहेत, असे मुळीच नाही, काहींचा लेखन दर्जा हा कठोर समिक्षेचाही विषय आहे. मात्र प्रकाश पर्येकर या अस्सल व कसदार लेखन करणाऱ्या लेखकाला काल जाहीर झालेला पुरस्कार हा निःसंशयपणे गोव्याचा यथार्थ गौरव आहे. सत्तरी तालुक्यातील दुर्गम भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातून पर्येकर पुढे आले. उच्च शिक्षण घेतले. निष्ठेने व प्रामाणिकपणे कोकणीतून साहित्यनिर्मितीचा मार्ग पत्करला. त्यांच्या कथासंग्रहाला योग्य टप्यावर साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. हा सत्तरी तालुक्याच्या प्रत्येक भूमिपुत्राचाही गौरव आहे. 

रवींद्र केळेकर, मनोहरराय सरदेसाय, दामोदर मावजो, महाबळेश्वर सैल, पुंडलिक नायक, उदय भेंब्रे, स्व. चंद्रकांत केणी, हेमा नायक, स्व. रमेश वेळुस्कर, एन. शिवदास आदी अनेकांनी कोकणी साहित्य निर्मितीच्या यज्ञात आपापले योगदान दिलेले आहे. यापैकी अनेकजण अजून लिहित आहेत. पर्येकर यांच्यासह डॉ प्रकाश वजरीकर, मुकेश थळी, जयंती नायक, माया खरंगटे, शिला कोळंबकर, परेश न. कामत, राजय पवार, देविदास कदम आदी अनेकांनी साहित्यसेवा चालवली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने कोकणी भाषेतील पुस्तके प्रसिद्ध होतात, गोवा सरकारने कोकणी व मराठी या दोन्ही भाषांच्या अकादमींना वाळीत टाकल्यासारखी स्थिती आहे. अर्थात राज्यकर्ते केवळ बोलण्यापुरते व प्रसिद्धीपुरतेच साहित्यप्रेम दाखवतात. मात्र गोव्यातील नवयुवक मराठी व कोकणी या दोन्ही भाषांमध्ये लिहीत आहेत. त्यापैकी काहीजण मोठी झेप घेऊ शकतील, अशा दर्जाचे लेखन करतात.

पुंडलिक नायक यांची 'अच्छेव' कादंबरी अजूनही देशाच्या विविध भागांतील लेखकांच्या चर्चेत असते. भाई मावजो यांची 'कार्मेलिन' तर अनेक ठिकाणी वाखाणली, गौरविली जाते. महाबळेश्वर सैल यांच्या लेखनाची पताका सर्वदूर फडकलेली आहे. कोंकणीत केवळ सारस्वतच लिहितात हा एकेकाळचा समज खोटा ठरवत बहुजन समाजातील लेखकांनी कोकणी साहित्य निर्मितीची ध्वजा कधी खांद्यावर घेतली, हे भाषावादात अडकलेल्यांना कळलेदेखील नाही.

मावजो यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराचीही योग्य दखल लोकमतने घेतली होती. पर्येकर यांना काल दिल्लीहून जाहीर झालेला साहित्य अकादमी पुरस्कार हा बहुजनांमधील कष्टकरी हातांचा सत्कार आहे. ज्या पायांनी म्हादयीची परिक्रमा पर्येकर यांनी पूर्ण करत नदी पात्रात पाऊलखुणा उमटविल्या, त्या अमीट खुणांचाही हा तेजस्वी सन्मान आहे. नव्या युवकांना त्यांचे लेखनातील सातत्य व साधना प्रेरणा देईल. पुरस्कार मिळाल्याने लेखकाचा हुरूप वाढतो. मराठीतील निर्मितीसाठी महाराष्ट्रातील कृष्णात खोत यांना (रिंगाण) अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. मराठीत कसदार साहित्यनिर्मितीची गंगा वाहत असतेच. कोंकणीही समृद्ध झाली आहे. खोत व पर्येकर यांचे अभिनंदन.

 

Web Title: true glory of goa the sahitya akademi award for dr prakash paryekar story book

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.