त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव शाश्वत विजयाचे प्रतीक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:06 IST2025-11-07T07:05:08+5:302025-11-07T07:06:16+5:30
वाळवंटी तीरी त्रिपुरारी उत्सव रंगला, आकर्षक नौका ठरल्या युवावर्गाच्या कर्तृत्वाची झलक

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव शाश्वत विजयाचे प्रतीक: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा शाश्वत विजयाचे प्रतीक आहे. गोव्याची संस्कृती परंपरा जपणारा हा उत्सव संस्कृतीचे संचित असल्याचे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
विठ्ठलापूर साखळी येथे प्रति पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल मंदिराच्या परिसरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे आयोजन नौका आणि स्पर्धा व इतर पांस्कृतिक कलात्मक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. त्यांच्यासोबत आमदार प्रेमेंद्र शेट, डॉ. चंद्रकांत शेट्ये, नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, दयानंद बोर्येकर, देवस्थानचे पदाधिकारी, कला व संस्कृती खाते, माहिती खाते पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांस्कृतिक चारसा जपणारा उत्सव अनेक वर्षे पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे. आकर्षक नौका तयार करून येथील युवावर्ग आपल्या व सामान्य कर्तृत्वाची झलक दाखवत असल्याचे ते म्हणाले.
प्रकाशित होड्या, तरंगते दिवे, प्रार्थना आणि संगीतासह ही अनोखी गोव्याची परंपरा खरोखरच आपल्या भूमीच्या आत्याचे प्रतिबिंबित करते. गोवा त्याच्या निसर्गरम्य सौंदर्यासाठी जगभरात ओळखला जातो. परंतु आपली संस्कृती, वारसा, मंदिरे, नद्या, लोककला आणि सामुदायिक भावना राज्याला त्याची खरी ओळख देतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार गोव्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी वचनबद्ध आहे.
बोटी जाणार इफ्फीत
या भागातील युवा कलाकारांनी आकर्षक बोटी निर्माण करताना प्रत्यक्ष अभियंत्यांनाही एक वेळ जमणार नाही अशा प्रकारच्या कलाकृती निर्माण करून आपल्यातील उत्कृष्ट प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. पहिल्या तीन क्रमांकाच्या बोटींना कला अकादमी रवींद्र भवन तसेच इफ्फी केंद्रात या ठिकाणी प्रदर्शित करून या युवा कलाकारांच्या असामान्य कौशल्याचे दर्शन घडवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्रिपुरारी उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा
राज्यातील विद्यार्थी, युवा कलाकार, शिप बिल्डिंग इंजिनिअर डिझायनरपेक्षाही चांगल्या प्रकारे बोटीच्या माध्यमातून कलेचा आविष्कार घडवत आहेत. नावीन्य, तंत्रज्ञान संशोधन, कौशल्य या क्षेत्रात युवाशक्ती पुढे येत असून विकसित भारत व विकसित गोवा २०३७ साठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्रिपुरारी उत्सव संस्कृती-परंपरा जपणारा राज्य उत्सव असून सरकार राज्यात विविध उत्सवांना राज्य उत्सवाचा दर्जा देऊन संस्कृती, परंपरा टिकवण्यासाठी सदैव कार्यरत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.