पारंपरिक पर्यटन व्यवसाय गोमंतकीयांच्याच हाती राहावेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:50 IST2023-03-29T18:50:22+5:302023-03-29T18:50:49+5:30
अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटनेची मागणी

पारंपरिक पर्यटन व्यवसाय गोमंतकीयांच्याच हाती राहावेत!
पूजा प्रभूगावकर, पणजी (गोवा): सरकार आमचे पारंपरिक पर्यटन व्यवसाय कॉर्पोरेट लॉबीच्या हाती देऊ पाहत आहे. पारंपरिक व्यवसाय हे गोमंतकीयांच्याच हाती रहावेत अशी जाेरदार मागणी अखिल गोवापर्यटन भागधारक संघटनेने केली आहे.
राज्यातील विविध पर्यटन संबंधित व्यवसायांना परवाने जारी करण्याचे काम गोवा इलेक्ट्रॉनिक्स अर्थात जीईएलकडे सोपवले आहे; मात्र भरमसाठ शुल्क आकारुन सुध्दा वेळेत परवाने मिळत नाही. सरकारने जीईएलकडून परवाने जारी करण्याचे काम काढून घेऊन ते पुन्हा पर्यटन खात्याकडे सोपवावे अशी मागणीही संघटनेने केली आहे.
राज्यातील किनारी शॅक्स व्यावसायिक, खासगी शॅक्स व्यावसायिक, टॅक्सीमालक, रेंट अ बाईक व्यावसायिक, जलक्रीडा व्यावसायिक, बार ॲण्ड रेस्टॉरंट व्यावसायिक, रापणकार मच्छीमार आदींनी एकत्र येऊन ही अखिल गोवा पर्यटन भागधारक संघटना स्थापन केली आहे. त्यानुसार या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या.