निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी
By किशोर कुबल | Updated: June 20, 2024 14:03 IST2024-06-20T14:03:05+5:302024-06-20T14:03:25+5:30
जीएसटी सुधारणांबाबत गोव्यातील उद्योजकांच्या मागण्यांचे निवेदन गोवा चेंबर ॲाफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले.

निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी
पणजी : जीएसटी सुधारणांबाबत गोव्यातील उद्योजकांच्या मागण्यांचे निवेदन गोवा चेंबर ॲाफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले. सर्व निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री दिल्लीत उद्या होणार असलेल्या जीएसटी मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर धेंपे, रोहन भांडारे, यतीश पै वेर्णेकर, नवीन जाजू, संजय आमोणकर यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
अप्रत्यक्ष कराच्या बाबतीत जीएसटी सुलभ करण्यासाठी दर तर्कसंगतीकरण, कर ओझे कमी करणे, शुल्क संरचनेत दुरुस्ती करणे, जीएसटी माफी योजनेचा लाभ द्यावा, इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी वेळ मर्यादा वाढवण्यासाठी कलम १६ (४) मध्ये दुरुस्ती करावी, परताव्याची जलद प्रक्रिया, जीएसटी रिटर्न्समध्ये सुधारणा करण्यासाठी सुविधेची अंमलबजावणी, नवीन करदात्यांसाठी एक खिडकी नोंदणीची सुविधा, हॉटेल निवासासाठी जीएसटी दर १२ टक्केच्या एकल दरात तर्कसंगत करावा, रेस्टॉरंटसाठी आयटीसी लाभांसह १२ टक्के जीएसटी आकारण्याचा पर्याय, रिअल इस्टेट क्षेत्राला जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिटची परवानगी देणे, डेव्हलॉपर्सवरील कराचा बोजा कमी करावा, हॉटेल्स/घरांसाठी बांधकाम वस्तूंवर इनपुट टॅक्स क्रेडिटची सुविधा देणे, जहाजबांधणी उद्योगासाठी इनव्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर्समुळे कार्यरत भांडवलाचा अडथळा कमी करणे, आयटीसी बदलल्यावर देय व्याजात सूट द्यावी, आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत.मुख्यमंत्र्यांनी यावर सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.