गोव्यातील किनारे पाण्याखालीच, दक्षिण व उत्तर गोव्याला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 17:10 IST2018-10-11T17:09:30+5:302018-10-11T17:10:36+5:30

लुबान वादळाच्या तडाख्यातून अजूनही गोव्याची किनारपट्टी प्रभावित असून गुरुवारी (11 ऑक्टोबर) दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते.

Tourism hit due to luban storm Goa beaches vanish | गोव्यातील किनारे पाण्याखालीच, दक्षिण व उत्तर गोव्याला फटका

गोव्यातील किनारे पाण्याखालीच, दक्षिण व उत्तर गोव्याला फटका

मडगाव - लुबान वादळाच्या तडाख्यातून अजूनही गोव्याची किनारपट्टी प्रभावित असून गुरुवारी (11 ऑक्टोबर) दुपारी पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण आणि उत्तर गोव्यातील किनारे पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत होते. बुधवारपेक्षा गुरुवारी अधिक पाणी किना-यावर आल्याने या किनारपट्टीवरील शॅक पुन्हा एकदा पाण्याखाली गेले. दक्षिण गोव्यात कोलवा, बाणावली, माजोर्डा, उतोर्डा, काणकोण तर उत्तर गोव्यात कांदोळी, कळंगूट, सिकेरी, वागातोर, अंजुणा, मोरजी आणि हरमल या किना-यावर पाणी वाढलेले दिसत होते. पाणी वाढल्यामुळे शॅक उभारणीचे काम पूर्णपणे ठप्प झाले असून जोपर्यंत पाणी उतरत नाही तोर्पयत हे काम सुरु करता येणे कठीण अशी परिस्थिती झाली आहे. आपली अधिक नुकसानी होऊ नये यासाठी बहुतेक शॅकवाल्यांनी बुधवारी रात्रीच आपले सामान प्रभावीत क्षेत्रपासून दूर नेल्याने गुरुवारी शॅकवाल्यांना फारसे नुकसान झालेले नाही अशी माहिती खासगी शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष क्रूझ कादरेज यांनी दिली.

कोलवा किनारपट्टीवर पाण्याची पातळी वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीवरक्षकांसाठी बांधलेला मनोराही पाण्याखाली गेला होता. पर्यटकांनी या खवळलेल्या समुद्रात उतरु नये यासाठी किना-यावर लाल धोक्याचे झेंडे ठिकठिकाणी लावल्याचे दिसत होते.
मागच्या वर्षी आलेल्या ओखी वादळाने गोव्यातील शॅक मालकांचे कंबरडे मोडले होते. त्या वादळात शॅकवाल्यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. हे नुकसान यावेळी भरुन काढण्याच्या इराद्याने गोव्यातील सर्व समुद्र किना-यावर शॅक उभारणीच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र हे काम चालू असतानाच लुबानचा फटका बसल्याने हे व्यावसायिक पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.
कोलवा येथील एका व्यावसायिकाने सांगितले की, बुधवारी रात्री पाण्याची पातळी उतरु लागली होती. त्यामुळे आम्हाला काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र गुरुवारी  दुपारी पुन्हा एकदा पाणी वाढले. ही वाढ बुधवारपेक्षा अधिक होती. येत्या दोन दिवसात परिस्थिती जाग्यावर येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे असेही या व्यावसायिकाने सांगितले.


 

Web Title: Tourism hit due to luban storm Goa beaches vanish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.