तिळारी-आमठाणे जलवाहिनी
By Admin | Updated: August 5, 2014 01:48 IST2014-08-05T01:44:29+5:302014-08-05T01:48:35+5:30
पणजी : वारंवार फुटणाऱ्या कालव्यांमुळे तिळारी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यावर मात करण्यासाठी तिळारी-आमठाणे जलवाहिनी

तिळारी-आमठाणे जलवाहिनी
पणजी : वारंवार फुटणाऱ्या कालव्यांमुळे तिळारी धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय येतो. त्यावर मात करण्यासाठी तिळारी-आमठाणे जलवाहिनी टाकण्याची घोषणा विधानसभेत सोमवारी करण्यात आली. त्यामुळे उत्तर गोव्यात उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणी टंचाईच्या झळा कमी होतील.
शेतीसाठी कालव्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तिळारी महामंडळाचा गाशा गुंडाळण्यात येणार असून पुढील काळात जलस्रोत खातेच जलवाहिनी टाकण्यासह इतर कामे करणार असल्याचे खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी स्पष्ट केले.
खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मांद्रेकर म्हणाले की, दोन दिवसांपूर्वीच उभय राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची वरील जलवाहिनी, तसेच तिळारी विस्थापितांच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. म्हादईचे पाणी कोणत्याही परिस्थितीत वळवू न देण्याबाबत सरकार ठाम आहे आणि त्याबाबत कर्नाटकची मुळीच गय केली जाणार नाही.
आमदार विष्णू वाघ यांनी हरवळे धबधब्यात एका कारखान्याचे सांडपाणी सोडले जात असल्याने धबधब्याचे पाणी दूषित झाले आहे, याकडे लक्ष वेधून संबंधित कंपनीवर कारवाईची मागणी केली. आमदार किरण कांदोळकर यांनी तिळारीच्या बांधकामात ज्यांनी घोटाळा केला, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली. तिळारी महामंडळ बंद करून खात्याने कामे हाती घ्यावीत, असे त्यांनी सुचविले. कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने थिवी, सिरसई भागात शेतामध्ये पाणी येऊन पीक नष्ट होते, असे ते म्हणाले.
आमदार नरेश सावळ यांनी तिळारी कालव्याचे पाणी शेतात शिरते व त्यामुळे पिकांचे नुकसान होते, याकडे लक्ष वेधले. आपत्ती व्यवस्थापनाला सोबत घेऊन जलस्रोत खात्याने कामे कारायला हवीत, असे त्यांनी सुचविले. आमदार विजय सरदेसाई यांनी कोमुनिदादकडून येणाऱ्या अडचणींमुळे नाल्यांमधील गाळ उपसण्याचे काम अडते, याकडे लक्ष वेधले. फातोर्डा येथे सांडपाणी वाहिनी फुटून विहिरी दूषित झाल्या आहेत, हे त्यांनी निदर्शनास आणले. आमदार रोहन खंवटे यांनी पर्वरीत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची मागणी केली. अनेक अन्य आमदारांनी नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न उपस्थित केला. (प्रतिनिधी)