वाघांना टाकले वाळीत
By Admin | Updated: January 24, 2015 01:53 IST2015-01-24T01:50:59+5:302015-01-24T01:53:29+5:30
भाजप नाराज : कामे न करण्याची मंत्र्यांना सूचना

वाघांना टाकले वाळीत
पणजी : कळंगुट येथे झालेल्या भाजपच्या चिंतन बैठकीवर बहिष्कारानंतर आमदार विष्णू वाघ यांना भाजपने आता पूर्ण वाळीतच टाकले आहे. आमदार वाघ यांची कामे न करण्याची सूचना भाजपतर्फे सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. स्वत: वाघ यांनाही या सूचनेची कल्पना आहे.
वाघ यांनी चिंतन बैठकीसाठी यावे म्हणून भाजपने प्रयत्न केला होता; परंतु वाघ यांना कोणतेही पद न देता ठेवले गेल्यामुळे वाघ यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. चिंतन बैठकीत सहभागी होणार नाही, अशी भूमिका वाघ यांनी घेतली. वाघ यांच्याविषयी भाजपच्या चिंतन बैठकीत बरीच चर्चा झाली. वाघ यांची कोणतीच कामे कुणी करू नका, अशी सूचना त्या वेळी मंत्र्यांना केल्याची माहिती मिळते. चिंतन बैठकीतून ही माहिती बाहेर फुटली व काही आमदारांकडून वाघ यांना याची कल्पना मिळाली. एरव्ही देखील सांतआंद्रे मतदारसंघाशी संबधित आपली कामे मंत्री करतच नव्हते, त्यामुळे आताही काही फरक पडणार नाही, असा अलिखित संदेश वाघ यांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविला. एकंदरीत वाघ यांची पूर्ण राजकीय कोंडी केली आहे. तरीही वाघ यांना भाजपमध्ये काय चालते याची बरीच माहिती त्यांच्या काही हितचिंतकांकडून मिळत आहे. (खास प्रतिनिधी)