काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
By Admin | Updated: May 20, 2014 01:29 IST2014-05-20T01:29:22+5:302014-05-20T01:29:22+5:30
पणजी : काँग्रेसच्या ताब्यातील नऊपैकी आठ विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्यामुळे अस्वस्थ झालेले काही काँग्रेस आमदार आता भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत.

काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर
पणजी : काँग्रेसच्या ताब्यातील नऊपैकी आठ विधानसभा मतदारसंघात भाजपने आघाडी घेतल्यामुळे अस्वस्थ झालेले काही काँग्रेस आमदार आता भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. काही बेभरंवशाचे आमदार तर स्वत:चा नवा पक्ष स्थापन करण्याच्याही हालचाली करू लागले आहेत. ताळगाव, सांताक्रूझ, कुंभारजुवे, वाळपई, पर्ये, केपे, मडगाव असे मतदारसंघ हे काँग्रेसचे अभेद्य गड समजले जात होते. मात्र, भाजपने या अभेद्य गडांना सुरूंग लावण्यात यश मिळविल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झाले. यामुळे काही आमदारांच्या व एकूणच काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या हृदयात धडकी भरली आहे. काहीजण तर सैरभैर झाले असून ते भाजपच्या काही नेत्यांशी व पदाधिकार्यांशी गेले काही दिवस सातत्याने संपर्कात आहेत. पर्रीकर सरकार पूर्णत: बहुमतात आहे. शिवाय केंद्रात मोदी सरकार आल्याने पर्रीकर सरकार अतिशय बळकट बनले आहे. या सरकारला काँग्रेसच्या आमदारांची गरज नाही; पण काँग्रेस विधिमंडळ पक्षात फूट पडलेली काहीजणांना हवी आहे. ताळगावचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी तर प्रसंगी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा निवडणुकीस जाण्याची तयारी ठेवली आहे. आपण नवा पक्ष स्थापन करीन, असे मोन्सेरात यांनी जाहीर केले आहे; पण मोन्सेरात हे गंभीर व राजकीयदृष्ट्या विश्वासार्ह आमदार नव्हे, असे काहीजणांना वाटते. आमदार विजय सरदेसाई यांच्याही मोन्सेरात संपर्कात आहेत. आमदार पांडुरंग मडकईकर हेही कुंभारजुवेत काँग्रेसला आघाडी न मिळाल्याने नाराज झाले आहेत. तेही मोन्सेरात गटातील आमदार मानले जातात. मोन्सेरात यांची आमदार दिगंबर कामत यांच्याशीही बोलणी झाली आहे; पण कामत व मडकईकर हे काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले. आमदार विश्वजीत राणे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी द्यायची नाही, असे ठरविले आहे; पण मोन्सेरात त्यांच्याही संपर्कात आहेत. (खास प्रतिनिधी)