मगोप सोडलेल्यांना पुन्हा प्रवेश किंवा तिकीटदेखील देणार नाही: सुदिन ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 13:11 IST2025-07-08T13:10:17+5:302025-07-08T13:11:02+5:30
पक्षाच्या आमसभेने आधीच निर्णय घेतल्याची माहिती

मगोप सोडलेल्यांना पुन्हा प्रवेश किंवा तिकीटदेखील देणार नाही: सुदिन ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश नाही तसेच निवडणुकीसाठी तिकीटदेखील दिले जाणार नाही, असा कडक निर्णय मगोपच्या आमसभेने याआधी घेतलेला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
याबाबत पत्रकारांच्या एका प्रश्नावर बोलताना मंत्री ढवळीकर म्हणाले की, '२००७ नंतर हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. काहीजण पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येतात व पक्षाला बाधक वक्तव्ये करतात व नंतर पक्ष सोडून अन्य पक्षात प्रवेश करतात. आम्ही तिकीट देऊन निवडून आणतो व नंतर ते पक्ष सोडून जातात, हे यापुढे चालणार नाही. आमसभा जो निर्णय घेते तो मी किंवा पक्षाचा अध्यक्षही बदलू शकत नाही'
ढवळीकर म्हणाले की, 'आणखी एक महत्त्वाचा निर्णय आमसभेने घेतला आहे, तो म्हणजे मगोपच्या तिकिटावर प्रथमच आमदार म्हणून निवडून येणाऱ्याने पहिल्या टर्ममध्ये मंत्रिपद मागू नये. प्रथमच निवडून येणाऱ्याने एखादे महामंडळ स्वीकारावे. इतर काही गोष्टी शिकाव्यात, असा पक्षाचा आग्रह आहे. तर काही करता येते.'
... पक्ष सोडायला नको होता
सुदिन ढवळीकर म्हणाले की, 'मी केवळ मगोपबद्दलच बोलतोय असे नव्हे तर अन्य पक्षातही असे काही नेते आहेत, जे पक्षाच्या तिकिटावर निवडून येऊन मुख्यमंत्री बनले व नंतर त्यांनी पक्ष सोडला.' लक्ष्मीकांत पार्सेकर व दिगंबर कामत यांच्या नावांचा उल्लेख करून ढवळीकर म्हणाले की, 'या दोघांनी पक्ष सोडायला नको होता, असे माझे वैयक्तिक मत आहे. मगोपतून असे अनेकजण गेले, खास करून चांगले नेते गेले. त्यामुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले.'
प्रत्येकाला नशीब आजमावण्याचा अधिकार : कामतांचा विजयला टोला
'नशीब आजमावण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे', अशी प्रतिक्रिया आमदार दिगंबर कामत यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सुरू केलेल्या 'जनता दरबार'वर दिली. आमदार सरदेसाई यांनी विधानसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी 'जनता दरबार' घेतले आहेत. आतापर्यंत त्यांनी पेडणे, म्हापसा, डिचोली, काणकोण येथे दरबार घेतले आहेत.
दरम्यान, मडगाव पालिका निवडणुकीत केवळ फातोर्थ्यातच नव्हे, तर मडगावातील प्रभागांमध्येही आपण उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. २०२७ च्या विधानसभेवेळी गोवा फॉरवर्ड मडगावमधूनही लढू शकतो, असे भाष्य अलीकडेच विजय यांनी केल्याने दिगंबर व त्यांचे शत्रुत्व आणखी वाढले आहे.
कामत म्हणाले की, 'कोणी कोणालाही अडवू शकत नाही. उद्या मला जनता दरबार भरवावा असे वाटले तर मी तो भरवीन. सर्वांनाच नशीब आजमावण्याचा अधिकार आहे. निवडणुकीला बरेच दिवस आहेत.'