चोरांकडून सासू-सुनेचा खून

By Admin | Updated: January 31, 2015 02:33 IST2015-01-31T02:10:09+5:302015-01-31T02:33:03+5:30

वास्कोतील घटना : दुसरी सून गंभीर जखमी; मांगोर हिल येथील फ्लॅटमध्ये चोरी, तपासासाठी विशेष पथक

Thieves murder mother-in-law | चोरांकडून सासू-सुनेचा खून

चोरांकडून सासू-सुनेचा खून

वास्को : दरोडे व चोऱ्यांचा तपास लागत नसल्याने चोरटे मुजोर बनले असून वास्कोत एका फ्लॅटमधील ऐवज लंपास करताना चोरांनी सासू-सुनेचा गळा दाबून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत दुसरी सून गंभीर जखमी झाली असून वास्कोतील रहिवाशांत घबराट पसरली आहे. जखमी महिलेवर उपचार सुरू असल्याने चोरीच्या ऐवजाचा तपशील मिळालेला नाही.
राज्यात गेल्या काही दिवसांत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. विशेषत: दक्षिण गोव्यात चोरट्यांचा उच्छाद वाढला असून नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. मांगोर हिल-वास्को येथील श्री कामत पॅलेस को आॅपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या एका फ्लॅटमध्ये गुरुवारी उत्तररात्री झालेल्या जबरी चोरीत दोन महिलांना जीव गमवावा लागला. सिद्धार्थ नामदेव नाईक यांच्या मालकीच्या डुप्लेक्स फ्लॅटमध्ये चोरांनी प्रवेश करून सासू (उषा नामदेव नाईक, ५८) व एका सुनेचा (नेहा सिद्धार्थ नाईक, २८) गळा दाबून खून केला, तर दुसऱ्या सुनेला प्रतिमा प्रवीण नाईक (वय २६) मारहाण करत ऐवज लांबवून पोबारा केला. जखमीवर चिखलीतील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या मारहाणीत प्रतिमाकडे असलेल्या नेहाच्या सहा महिन्यांच्या मुलीला कोणतीही इजा झाली नाही.
शुक्रवारी पहाटे ४ वाजता सोसायटीमधील अभय गजानन पाटील यांनी वास्को पोलिसांना याबाबत माहिती दिली. या संदर्भात पाटील यांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास प्रतिमा नाईक जखमी अवस्थेत सहा महिन्यांच्या पुतणीसह आरडाओरड करत फ्लॅटमधून खाली आल्या. त्यांनी काही फ्लॅटधारकांची दारे ठोठावून जागे केले व आपल्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्याचे सांगितले़ सोसायटीचे पदाधिकारी श्रीनिवास राव व चिटणीस बाबूराव अनंत नाईक यांनी आत जाऊन पाहिले असता, त्यांना उषा नाईक या बाहेरील हॉलमध्ये, तर वरच्या माळ्यावर असलेल्या बेडरुममध्ये नेहा नाईक बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडल्याचे आढळले़ तसेच बेडरुम व स्वयंपाकघराच्या बाजूला असलेली दोन कपाटे उघडी असल्याचे व त्यातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्तपणे जमिनीवर टाकल्याचे दिसून आले़
त्यानंतर इमारतीतील रहिवाशांनी पोलिसांना तसेच १०८ रुग्णवाहिकेला कल्पना दिल्यावर रुग्णवाहिकेतील परिचारकाने बेशुद्धावस्थेत असलेल्या सासू-सुनेची तपासणी केली असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर वास्को पोलीस स्थानकाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक निखील पालयेकर यांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह चिकित्सेसाठी मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठवून दिले़ दोन्ही मृतदेहांवर कसल्याही जखमा नसल्याने त्यांचा गळा दाबून खून करण्यात आला असावा, असा कयास आहे.
उषा नाईक या नेहा सिद्धार्थ नाईक या सुनेसह या फ्लॅटमध्ये राहत होत्या. दुसरी सून प्रतिमा नाईक हीसुद्धा अधूनमधून या फ्लॅटमध्ये राहते़ उषा हिचे सिद्धार्थ व प्रवीण हे दोन्ही मुलगे विदेशात जहाजावर कामाला असतात़ सध्या सिद्धार्थ फिलिपीन्स येथे, तर प्रवीण अमेरिकेत असून दोघांनाही या घटनेची पोलिसांनी तसेच नातेवाईकांनी माहिती दिली आहे.
हल्ल्याबाबत माहिती कळताच गोवा पोलीस खडबडून जागे झाले असून पणजी मुख्यालयातील सर्व ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली़ तसेच काही पोलीस स्थानकांवरील निरीक्षकांनाही घटनास्थळी बोलावून तपासकामात मदत घेण्यात येत आहे़ पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग, उपमहानिरीक्षक व्ही़ रंगनाथन, अधीक्षक कार्तिक कश्यप, उपअधीक्षक सुभाष गोलतेकर, मोहन नाईक, रवी देसाई, सिद्धांत शिरोडकर, संदेश चोडणकर, विश्वेश कर्पे, व्ही़ वेळुसकर आदी अधिकारी उपस्थित होते़ या सर्वांनी एकत्रितपणे या हल्ल्याचा तपास करण्याबाबत पावले उचलली आहेत.
या प्रकरणी चौकशीसाठी उपअधीक्षक लॉरेन्स डिसोझा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन केले असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी दिली. तीन निरीक्षक या पथकात असून एक महिला निरीक्षकही आहे. गुन्हा शाखाही या बाबतीत तपास करीत आहे, असे त्यांनी सांगितले. या घरातील पुरुष विदेशात नोकरीला असल्याने ते परतल्यानंतरच अधिक माहिती मिळू शकेल, असे गर्ग म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Thieves murder mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.