लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्य मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होतील, असे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी काल स्पष्ट केले आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज पाहण्यासाठी नाईक सोमवारी आले होते. त्यावेळी विधानसभा संकुलाबाहेर ते बोलत होते.
मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या अख्त्यारित येतो. त्यामुळे आपण त्यावर अधिक बोलू शकत नाही. अशा विषयांवर मुख्यमंत्री निर्णय घेतील. मात्र जो काही निर्णय होईल तो भाजप पक्षाला विश्वासात घेऊनच होईल. मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतही तसेच असल्याचे त्यांनी सांगितले.नाईक म्हणाले, की यापूर्वीही आपण मंत्रिमंडळात बदल घडतील, असे विधान केले होते. त्यानंतर तसे घडलेही होते. त्यामुळे आता देखील आपण तेच सांगतो. मात्र ते कधी होणार सांगू शकत नाही.
गणेश चतुर्थीपूर्वी की त्यानंतर घडेल यावर विधान करणार नाही. कारण ते मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारितील विषय आहे. मुख्यमंत्रीच काय तो योग्यवेळी योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.