गोव्यात होणार १७ हजार लखपती दीदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 13:18 IST2024-12-18T13:17:11+5:302024-12-18T13:18:12+5:30
आरडीएचे उद्दिष्ट : सेल्फ हेल्प ग्रुपसाठी राज्य सरकारला 'फ्लिपकार्ट' चे सहकार्य

गोव्यात होणार १७ हजार लखपती दीदी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून विविध वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या महिलांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकारने फ्लिपकार्टकडे हातमिळवणी केली आहे. राज्यात १७ हजार 'लखपती दीदी' बनवण्याचा संकल्प सोडण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात होतकरू महिला व्यावसायिकांना ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची हमी दिली.
यावेळी महिलांसाठी उत्पादनासाठी पॅकेजिंग, बॅण्डिंग आणि मार्केटिंग कसे करावे याविषयी कार्यशाळा यावेळी घेण्यात आली. व्यासपीठावर आरडीएचे संचालक गोपाळ पार्सेकर, फ्लिपकार्टचे कॉर्पोरेट व्यवहार प्रमुख रजनीश कुमार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'केंद्र सरकारने जरी ११ हजार 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट दिले असले तरी ते पार करून ज्या कुणी महिला वस्तूंचे उत्पादन करून उद्योजकतेकडे वळू पाहत आहेत, त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी याहूनही जास्त महिलांना त्यांची उत्पादने विकण्यासाठी सहकार्य दिले जाईल.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'ग्रामीण विकास यंत्रणेने १७ हजार महिला व्यावसायिकांना 'लखपती दीदी' बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे व ते पूर्ण केले जाईल. वस्तू विकून किमान एक लाख रुपये तरी नफा मिळावा, अशी अपेक्षा असून १७ हजार लखपती दीदी गोव्यात निर्माण करण्याचा सरकारचा ध्यास आहे.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'राजस्थानच्या सरस प्रदर्शनात गोव्याच्या वेगवेगळ्या दहा उत्पादनांना मानाचे स्थान मिळाले. कुणबी शाल, मंडोळची केळी, खोला येथील मिरची तसेच इतर उत्पादनांना मोठी मागणी होती. आज उकडे तांदूळ पिशव्यांमध्ये पॅकबंद करून १३० रुपयांनी किलो दराने विकले जात आहेत. केवळ बॅण्डिंग केल्याने हे शक्य आहे. कुणबी शाल ब्रेण्डिंग करून विकली त्याला मोठा प्रतिसाद लाभला. आरडीएच्या योजनेचा महिला व्यवसायिकांनी लाभ घ्यायला हवा. स्वतःचे आर्थिक सशक्तीकरण करायला हवे. महिला व्यवसायिकांनी केवळ शिकण्याची तयारी ठेवावी त्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे वेगवेगळे उपक्रम, कार्यशाळा राबवले जातील 'गोव्यातील महिला उद्योजकांच्या उत्पादनांना गोव्याबाहेर पूर्ण देशात बाजारपेठ मिळवून देण्याची संधी फ्लिपकार्टने उपलब्ध करून दिली आहे.'
मांडली यशोगाथा
याप्रसंगी यशस्वी महिला व्यावसायिक हेमा बुगडे (अस्नोडा) व स्नेहा नाईक (तुयें) यांनी आपली यशोगाथा सांगितली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. पुढील वर्षभरात लखपती बनू, असा दृढ निर्धार या महिलांनी याप्रसंगी केला.
काय आहे 'लखपती दीदी' योजना !
'लखपती दीदी' योजना ही सेल्फ हेल्प महिला ग्रुपसाठी आहे. ज्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. महिलांना शाश्वत उपजीविकेच्या पद्धतींचा अवलंब करून उत्तम जीवनमान प्राप्त करून प्रेरणा देण्याचे उद्दिष्ट आहे. उद्योजकीय उपक्रमांसाठी महिलांना सशक्त बनवून आर्थिक साक्षरता आणि कौशल्य विकास, सदस्यांना वैविध्यपूर्ण उपजीविकेच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते. महिलांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळवून दिली जाते.