नील अर्थव्यवस्थेसाठी राज्यात बराच वाव: मुख्यमंत्री सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:17 IST2025-01-03T08:17:24+5:302025-01-03T08:17:24+5:30
कांपालला येत्या १० ते १२ या काळात मेगा फिश फेस्टिव्हल

नील अर्थव्यवस्थेसाठी राज्यात बराच वाव: मुख्यमंत्री सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात नील अर्थव्यवस्थेसाठी बराच वाव आहे. युवकांनी मत्स्योद्योगाकडे वळावे, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. मेगा फिश फेस्टिव्हल येत्या १० ते १२ या काळात कांपाल मैदानावर होणार असून त्या अनुषंगाने जागृती करण्यासाठी व्हॅनला बावटा दाखवून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
ही व्हॅन गावागावात फिरणार आहे. पर्वरी येथे झालेल्या या कार्यक्रमास मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर तसेच खात्याच्या संचालिका यशस्विनी या उपस्थित होत्या. मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'मत्स्य व्यवसायात गोवा स्वयंपूर्ण बनायला हवा. एनआयओ तसेच अन्य एका संस्थेचा सहभाग घेऊन काही उपक्रम सरकार राबवत आहे. या क्षेत्रात करियर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळा, विविध मासळीचे प्रदर्शन तसेच पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी मेगा फिश फेस्टिव्हलमध्ये मिळणार आहे. केंद्र सरकारच्या मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेऊन युवकांनी या क्षेत्रात पुढे यायला हवे.'
मंत्री नीळकंठ हळर्णकर म्हणाले की एरवी हा फिश फेस्टिव्हल फेब्रुवारीत होतो. परंतु यंदा फेब्रुवारीत शालांत व उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षा असल्याने महिनाभर आधी होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.