...तर रेंट ए कॅबवाल्यांचे परवाने निलंबित करणार; नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2025 09:54 IST2025-02-22T09:54:33+5:302025-02-22T09:54:41+5:30

नियमांचे उल्लंघन पडणार महागात

then the licenses of rent a cab owners will be suspended notice issued | ...तर रेंट ए कॅबवाल्यांचे परवाने निलंबित करणार; नोटीस जारी

...तर रेंट ए कॅबवाल्यांचे परवाने निलंबित करणार; नोटीस जारी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विमानतळ, रेल्वे स्थानक तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेंट ए कॅबवाल्यांचे परवाने निलंबित किंवा रद्द केले जातील, असा इशारा देणारी नोटीस वाहतूक खात्याचे संचालक प्रविमल अभिषेक यांनी बजावली आहे.

१९८९ च्या रेंट ए कॅब योजनेनुसार रेंट ए कॅबवाल्यांना अटी व निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु याचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. कलम ८ (२) नुसार व्यवसायाचे ठिकाण पूर्वपरवानगीशिवाय बदलता येत नाही. काही रेंट ए कॅबवाले याचे उल्लंघन करीत असल्याचे आढळून आले आहे.

परवानगीशिवाय विमानतळाच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्थानके अथवा अन्य सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे व्यवसाय केल्यास परवाने निलंबित किंवा रद्द केले जातील, असे या नोटिसीत संचालकांनी म्हटले आहे. १९८९ च्या रेंट-ए-कॅब योजनेअंतर्गत रेंट-अ-कार परमिट जारी केले जातात, त्यावेळी काही अटी घातल्या जातात. त्याचे पालन होणे अपेक्षित असते. पर्यटक गोव्यात येतात. गाड्या भाड्याने घेतात. अनेकदा बेदरकारपणे गाड्या चालवून अपघातही घडत असतात.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी मांडवी पुलावर एका पर्यटकाने रेंट ए कार भरधाव हाकल्याने अपघात होऊन मयडे-बार्देश येथील दुचाकीस्वार पाण्यात फेकला जाऊन मृत्यूमुखी पडला होता. दरम्यान, अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी या नोटिसीचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की,' वाहतूक खात्याने काढलेली ही नोटीस कायद्याला धरुनच आहे. या नोटिसीची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे व्हायला हवी. अनेकदा अशा नोटिसा काढल्या जातात, परंतु पुढे कोणतीच कारवाई होत नाही.

टुरिस्ट टॅक्सीचालकांचा गोवा माईल्सशी वाद चालू असतानाच तसेच मारहाणीचेही प्रकार घडत असताना आता रेंट ए कारवाल्यांनी व्यवसायाचे ठिकाण बदलून नवीन प्रश्न उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक खात्याने ही नोटीस जारी केली आहे.

८ हजार रेंट ए कॅब

राज्यात सुमारे ८ हजार रेंट ए कॅब आहेत. दहा ते बारा बड्या व्यावसायिकांकडेच हा धंदा आहे. त्यांनी नियमानुसार आपल्या कार्यालयाच्या ठिकाणाहूनच ग्राहक मिळवावेत. परंतु अनेक रेंट ए कॅब विमानतळ, रेल्वे स्थानकांवर ग्राहक मिळवण्यासाठी जातात व त्यामुळे टुरिस्ट टॅक्सीवाल्यांचा धंदा बुडतो.
 

Web Title: then the licenses of rent a cab owners will be suspended notice issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.