...तर मी कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद केली असती; विजय सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 12:00 IST2025-09-06T12:00:06+5:302025-09-06T12:00:23+5:30
वास्कोत कॅसिनो आणा, पण कोळसा आम्हाला नको. कॅसिनोमुळे लहान-मोठ्या उद्योजकांना फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाले. पण कोळशामुळे या सर्व गोष्टी संपल्या.

...तर मी कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद केली असती; विजय सरदेसाई यांचा सरकारवर हल्लाबोल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोळशाचा राज्याला काहीच उपयोग होणार नाही. राज्य आपले आहे आणि आपल्या राज्याचा हिताचा निर्णय आपणच घेतला पाहिजे. जर मी उद्या मुख्यमंत्री झालो तर राज्यातील कोळसा वाहतूक पूर्णपणे बंद करेन असे मत गोवा फॉरवर्डचे नेते, आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. या गोष्टीवर केंद्रावर अवलंबून राहणे चुकीचे आहे असे ते म्हणाले.
सरदेसाई म्हणाले की, 'कोळशाचा फायदा केवळ हफ्ते घेणाऱ्यांनाच होत आहे. त्यांना सांभाळण्यासाठी म्हणून हे सरकार कोळसा आणण्यावर भर देत आहे. राज्याला कोळशाची गरजच नाही. जेवढा आवश्यक आहे, तेवढा ठिक. पण यात वाढ करणे हे राज्याला परवडणार नाही. यातून पर्यटन संपुष्टात येईल. आगामी निवडणुकीत आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात कोळसाविरोधी धोरण राबविण्याचे आश्वासन प्रामुख्याने असेल. या विषयाला पाठिंबा देऊन जो कोणी सरकार स्थापन करेल तर त्यांनादेखील आमचा पूर्ण पाठिंबा राहील' असेही सरदेसाई यांनी सांगितले.
सरदेसाई म्हणाले की, 'आमचो आवाज विजय अंतर्गत आम्ही जेव्हा वास्कोमध्ये गेलो तेव्हा कोळशाचे दुःष्परीणाम आम्हाला जाणवले. जे सामाजिक कार्यकर्ते कॅसिनो नको म्हणत होते, ते मला भेटून सांगायला लागले की, वास्कोत कॅसिनो आणा, पण कोळसा आम्हाला नको. कॅसिनोमुळे लहान-मोठ्या उद्योजकांना फायदा झाला, अनेकांना रोजगार मिळाले. पण कोळशामुळे या सर्व गोष्टी संपल्या. व्यवसाय उद्ध्वस्त झालेच. पण आरोग्यही लोकांचे संपले.'
राज्यातही व्होटचोरी आहेच...
काँग्रेसने, राहुल गांधी यांनी मांडलेल्या अनेक गोष्टी खऱ्या होत आहेत. 'व्होट चोरी' हा प्रकार केवळ केंद्र स्तरावरच नव्हे तर राज्यातही असे घडले आहे. येथे वेगळ्या माध्यमातून मते फोडण्यात येत आहेत. आमचा पक्ष स्थानिक असूनही सध्याच्या काळात मी सर्व ४० जागांवर उमेदवार उभे करू शकत नाही. तर मग बाहेरील पक्ष येथे येऊन एकाचवेळी ४० उमेदवार कसे उभे करतील? असा सवाल सरदेसाई यांनी केला. हे केवळ मते फोडण्याचे कारस्थान आहे. राज्यातील लोक हुशार झाले आहेत, त्यांना हे फोडाफोडी राजकारणाचे गणित बरोबर कळते. कुठला पक्ष उमेदवार उभे करून इतर कोणत्या पक्षाला फायदा करून देईल हेही लोकांना कळू लागले आहे. हीदेखील एक प्रकारची व्होटचोरी आहे. यावर वेळ येईल तेव्हा मी बोलेन, असेही सरदेसाई म्हणाले.
पण काँग्रेसने अपेक्षाभंग केला
आमदार सरदेसाई म्हणाले की, पक्षात अनेक नवे लोक येत आहेत. यात काँग्रेसचेदेखील काही नेते आहेत. पण मुद्दामहून आम्ही काँग्रेसचे नेते फोडून आणले नाहीत, तर जे कुणी काँग्रेसपासून लांब गेले किंवा सक्रिय नाहीत असे नेते आमच्या पक्षात येत आहेत. तेदेखील स्वतःहून येताहेत. आम्ही २०२२ सोबत काँग्रेससोबत युती करुन निवडणूक लढवली. आणि आताही सोबत आहोत. पण, काँग्रेसच्या नेतृत्वात एकता दिसत नाही. प्रमुख पक्ष सरकारला घेरण्यात अपयशी ठरला. यातून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे.