अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 08:04 IST2025-02-26T08:03:56+5:302025-02-26T08:04:35+5:30

पर्यटन महामंडळाच्यावतीने खास महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवपर्व या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

temples in remote areas will boost spiritual tourism said cm pramod sawant | अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री

अतिदुर्गम भागातील मंदिरे, आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार: मुख्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: आम्ही खरा गोवा अजून पाहिलेलाच नाही. पर्यटकांनासुद्धा अजून खऱ्या गोव्याची ओळख झालेली नाही. फक्त समुद्र किनारे हेच गोव्याचे सौंदर्य नसून, दुर्गम भागातील हवेशीर निसर्ग हेही गोव्याचे वैभव आहे. हे वैभव उलगडून दाखवण्याकरिताच समुद्र किनारी रमणाऱ्या पर्यटकांना निसर्गरम्य गावांमध्ये नेण्यासाठी वातावरण निर्माण करण्यात येईल. अध्यात्म पर्यटनमंदिरपर्यटनाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

पर्यटन महामंडळाच्यावतीने खास महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवपर्व या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार गणेश गावकर, पर्यटन खात्याचे संचालक केदार नाईक, पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, संगीतकार व गायक अवधूत गुप्ते, सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील मंदिरांनाही गर्भ श्रीमंत असा इतिहास आहे. काही मंदिरे मोगल व पोर्तुगीज राजवटीने नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर तांबडी सुर्लासारखी दुर्गम भागातील मंदिरे लोकांच्या योगदानामुळे सुरक्षित राहिली. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्यामुळेही गोव्यातील मंदिरे सुरक्षित राहण्यासाठी मदत झाली.

काहींकडून इतिहास पुसण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, मोगल व पोर्तुगीज राजवटीत जी मंदिरे उदध्वस्त करण्यात आली, त्यांचा जिर्णोद्धार करण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने सुरू केला आहे. काही मंदिरे उभीही राहिली आहेत. काही लोकांनी खरा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला तर मंदिर जिर्णोद्धारच्या माध्यमातून नव्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न आमचे सरकार करत आहे. पर्यटकांनी मंदिरांना भेट देऊन धार्मिक, आध्यात्मिक वातावरणाचा लाभ घ्या. या पर्यटनाला आपण गती द्यायची आहे.

शिवपर्व ठरणार मैलाचा दगड

ग्रामीण संस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी यासाठीच शिवपर्व यांच्यासारखे कार्यक्रम दुर्गम भागात यापुढेही होत राहतील. साकोर्डा येथे होत असलेला शिवपर्व हा कार्यक्रम निमित्ताने एक मैलाचा दगड ठरेल. ज्या भागात आज हा कार्यक्रम होत आहे, ती चार लाख चौरस मीटर जागा सरकारच्या मालकीचे असून, हे मैदान यापुढे शिवमैदान म्हणून ओळखले जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी जाहीर केले. खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार गणेश गावकर यांची यावेळी भाषणे झाली. त्यांनी सरकारच्यावतीने धार्मिक, अध्यात्मिक पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे सांगितले. अधिकाधिक लोकांनी यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले.
 

Web Title: temples in remote areas will boost spiritual tourism said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.