मंदिरे ही संस्कृतीची संचिते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 08:22 IST2025-03-11T08:21:46+5:302025-03-11T08:22:58+5:30
न्हावेलीत लक्ष्मीनारायण देवस्थानातर्फे सोहळा

मंदिरे ही संस्कृतीची संचिते: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : "देव देश आणि धर्मासाठी शतकांनुशतके पिढ्यानपिढ्या काम चालू आहे. मंदिरे ही आमच्या संस्कृतीची संचिते आहेत. हजारो वर्षांपूर्वीची मंदिरे आजही आम्हाला प्रेरणा देतात असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. न्हावेली-साखळी येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिर उभारणीत योगदान दिलेल्या मान्यवरांचा सन्मान सोहळ्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, 'तांबडी सुर्ला येथील श्री महादेवाचे मंदिर १३ व्या शतकातील आहे. ते पोर्तुगीज शासन काळातही सुरक्षित राहिले आणि आज न्हावेलीच्या ग्रामस्थांनी गोव्यातील एक सुंदर मंदिर उभारले. हे आगळे वेगळे मंदिर अनेक वर्षे एकतेचे प्रतिक बनून राहील. आज एकविसाव्या शतकात संघटितपणे सर्वांच्या सहकार्याने मंदिर साकारण्याचे काम न्हावेली येथील श्री लक्ष्मी नारायण देवस्थान समिती आणि गावातील लोकांनी करून दाखवले आहे. त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.
मंदिराची रचना सुबक
वेदांताचे सीईओ सप्तेश सरदेसाई यांनी हे ऐतिहासिक मंदिर गावाच्या ऐकतेचे प्रतिक असून त्याची रचना सुबक असल्याचे सांगितले. अध्यक्ष प्रेमानंद गावस यांनी उपस्थितांना मंदिर बांधणीविषयी माहिती दिली. मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते मंदिर बांधणीत विशेष सहकार्य देणाऱ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. देवस्थानच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विठ्ठल गावस यांनी स्मरणिकेसंदर्भात माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांचा सत्कार
मंदिर उभारणीत योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा जेष्ठ नागरिक नारायण गावस यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गोविद भगत यांनी सूत्रसंचालन केले. वेदांतचे सीईओ सप्तेश सरदेसाई, फोमेंतो कंपनीचे राजीव कुमार, सरपंच रोहिदास कानसेकर, देवस्थानचे अध्यक्ष प्रेमानंद गावस, चंद्रकांत गावस, आनंद गावस, विनायक गावस, उपसरपंच कल्पना गावस उपस्थित होते. कंत्राटदार संतोष जाधव यांचा सन्मान केला.