'कोविड'बाबत योग्य खबरदारी घेणार; आरोग्यमंत्री राणे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 13:59 IST2023-12-19T13:59:20+5:302023-12-19T13:59:27+5:30
अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक

'कोविड'बाबत योग्य खबरदारी घेणार; आरोग्यमंत्री राणे यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशात अनेक ठिकाणी कोविडचा संसर्ग पुन्हा वाढत असल्याचे आढळून आल्यामुळे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तातडीने आरोग्य अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. राज्यात परिस्थिती चिंताजनक नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे. परंतु खबरदारी घेतल्या जातील असेही सांगितले.
कोविडचा संसर्ग वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा साशंकता पसरली आहे. राज्यात कोविडचे २० सक्रिय बाधित आहेत. राज्यात कोविडच्या सक्रिय बाधितांची संख्या शून्य झाली होती ती आता वाढून २० पर्यंत पोहोचली आहे. मात्र, सोमवारी चाचणी करण्यात आलेल्या १६ सॅम्पलपैकी एकही बाधित आढळला नसल्याची माहिती गोमेकॉकडून देण्यात आली. परंतु मागील काही दिवसांपासून कोविडचे बाधित वाढू लागले आहेत.
दररोज एक ते तीन नवीन बाधित आढळत आहेत. त्यामुळे कोविडची लाट पुन्हा येण्याची शक्यता पडताळण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळेच आरोग्यमंत्र्यांनी यावर चर्चेसाठी तातडीने बैठक घेतली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिल्याचे राणे यांनी म्हटले आहे.