राष्ट्रीय शिक्षण, संशोधन संस्थांचा लाभ घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 11:58 IST2025-12-19T11:51:58+5:302025-12-19T11:58:27+5:30
गोपालकृष्णम् यांना मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार

राष्ट्रीय शिक्षण, संशोधन संस्थांचा लाभ घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'छोट्याशा गोवा राज्यात सरकारने मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय शिक्षण, संशोधन संस्था सुरू केल्या आहेत. या संस्थांचा जास्तीत जास्त स्थानिक युवकांनी लाभ घेत उच्च शिक्षणाची संधी साधावी' असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
गुरुवारी दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान केंद्रात आयोजित केलेल्या सातव्या मनोहर पर्रीकरविज्ञान परिषदेमध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध शास्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. किरण कुमार, डॉ. सुनील सिंग यांसह मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बेंगलोरचे युवा शास्त्रज्ञ डॉ. साई गौतम गोपालकृष्णम यांना यंदाचा २०२५ मधील मनोहर पर्रीकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देण्यात आला. यावेळी सावंत म्हणाले की, गेली सात वर्षे आम्ही महोत्सव साजरा करत आहोत. यंदाही १८ ठिकाणी १९ शास्त्रज्ञांचे ५,००० हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
महोत्सवामुळे राज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यास मदत होईल. जास्तीत जास्त युवकांनी अशा महोत्सवांचा फायदा घ्यावा. इनोव्हेशन टेक्नॉलॉजी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन आपण पूर्ण केले पाहिजे. त्यासाठी माय भारत पोर्टलवर अशा युवकांसाठी अनेक संधी आहेत.'
आपण आज ज्ञानाच्या युगात आहोत. त्यामुळे गोव्याच्या विकासासाठी आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी विज्ञान महोत्सवाची आवश्यक आहे, असे डॉ. काकोडकर यांनी यावेळी सांगितले.
परराज्यात जाण्याची गरज नाही : सावंत
मुख्यमंत्री म्हणाले, 'राज्य छोटे असूनही राष्ट्रीय समुद्र विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्र, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजेमेंट, बिट्स पिलानी, आयआयटी, एनआयटी, आयुष हॉस्पिटल, पारुल युनिव्हर्सिटी व अमिटी विश्वविद्यालय अशा राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण संस्था आहेत. स्थानिकांना उच्च शिक्षण संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे परराज्यात जाण्याची गरज नाही.
युवा शास्रज्ञांसाठी ही अनोखी संधी : काकोडकर
प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, 'राज्याप्रमाणे देशासाठीही मनोहर पर्रीकरांचे योगदान हे मोठे होते. ते अनेक युवकांचे प्रेरणास्थान ठरले. त्यांनी संरक्षण क्षेत्रात चांगले काम केले. आयआयटीयन असल्याने त्यांना विज्ञानाची खूप आवड होती. त्यांच्या स्मरणार्थ गोवा सरकारने सुरू केलेला हा खूप चांगला उपक्रम आहे. विज्ञानातून आपण विकसित होतो. मला युवा शास्त्रज्ञ पुरस्कार निवड समितीचे अध्यक्षपद दिले याचा आनंद होत आहे. देशभरातील युवा शास्त्रज्ञांसाठी ही चांगली संधी आहे.
विज्ञान शाखेत डॉक्टरेट खुप कमी : सुनील सिंग
यावेळी बोलताना एन आय ओचे संचालक प्रा. सुनील सिंग म्हणाले की, जगभारातील इतर प्रगत राष्ट्रे आणि त्यांची लोकसंख्या यांच्याशी तुलना करता आपल्या देशात विज्ञान शाखेतील डॉक्टरेट प्राप्त करणाऱ्यांची संख्या खुप कमी आहे. अशावेळी आपल्याला ज्ञानाची निर्मिती करणे गरजेचे आहे. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था उभारण्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आवश्यक आहे.