हणजूणच्या जगप्रसिद्ध फ्ली मार्केटला सुुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2017 21:04 IST2017-11-13T21:04:40+5:302017-11-13T21:04:57+5:30
म्हापसा : हणजूण येथील जगप्रसिद्ध अशा फ्ली मार्केटला दमदार सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेले हे फ्ली मार्केट हणजूण येथे दर बुधवारी भरते.

हणजूणच्या जगप्रसिद्ध फ्ली मार्केटला सुुरुवात
म्हापसा : हणजूण येथील जगप्रसिद्ध अशा फ्ली मार्केटला दमदार सुरुवात झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी सुरू झालेले हे फ्ली मार्केट हणजूण येथे दर बुधवारी भरते. हे मार्केट म्हणजे गोव्यात येणा-या देश-विदेशी पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत असते. आलेला पर्यटक इथे उपस्थिती लावल्याशिवाय माघारी जात नाही. विदेशी लोकांनी गोव्यात येताना आणलेल्या वस्तूंची विक्री या मार्केटचे एक वैशिष्ट्य मानले जाते. तसेच उत्तर भारतातील खास करून काश्मिरी व नेपाळी व्यापारी या मार्केटला उपस्थिती लावून आपल्या वस्तूंची विक्री करीत असतात.
या फ्ली मार्केटमध्ये लेदर, काचेच्या आकर्षक वस्तू, लोकरीच्या वस्तू, जुन्या पण किमती वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर इथे होत असते. या मार्केटात चालणा-या व्यवसायाला जोडून इतरही व्यवसाय चालतात. या व्यावसायिकांना सुद्धा बराच फायदा होत असतो. या किनारी भागातील स्थानिक हणजूण-कायसूव पंचायतीला या मार्केटपासून सर्वाधिक उत्पन्न मिळत असले तरी येथे येणा-या पर्यटकांना व व्यावसायिकांना ब-याच गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
हणजूण आठवडी बाजार म्हणून सरकार दरबारी नोंद असलेल्या या फ्ली मार्केटची व्याप्ती दरवर्षी वाढत असते. काही वर्षापूर्वी या मार्केटमध्ये दिड हजाराच्या आसपास दुकाने होती. आता त्यात प्रचंड वाढ होऊन साडेतीन ते चार हजारावर पोहोचली आहेत. सोपो पावणीत प्रचंड वाढ झाल्याने व्यावसायीकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. काही वेळा ठेकेदाराच्या दडपशाहीला सामोरे जावे लागते. पंचायतीचा ५ रुपये प्रतिचौरस मीटर असा दर असताना सरसकट २०० ते २५० रुपये व्यावसायिकांकडून आकारले जातात.
सोपोच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पंचायतीला उत्पन्न मिळत असूनही सुलभ शौचालये तसेच इतर सुविधांच्या अभावी पर्यटकांना व व्यवसायिकांना सामोरे जावे लागते. देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असूनही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणतीही उपाय योजना या ठिकाणी केली जात नाही. सीसीटीव्हीची सोय सुद्धा नसल्याने एखाद्या वेळेस अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.