बेशिस्त नेत्यांचे निलंबन चालूच राहील : जॉन
By Admin | Updated: August 26, 2014 01:20 IST2014-08-26T01:20:26+5:302014-08-26T01:20:52+5:30
पणजी : पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई चालूच राहणार असून आणखी काहीजणांचे निलंबन करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

बेशिस्त नेत्यांचे निलंबन चालूच राहील : जॉन
पणजी : पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई चालूच राहणार असून आणखी काहीजणांचे निलंबन करण्यात येणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी म्हटले आहे. आपल्याविरुद्ध बातम्या पेरण्याचे काम हे पक्षातील भ्रष्ट माणसे करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सोमवारी पणजी येथील पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण पार पाडत असलेली जबाबदारी ही हायकमांडच्या सल्ल्यानेच आहे. त्यामुळे हायकमांडकडून आपल्यावर कारवाई करण्याची आणि आपल्याला पदच्युत करण्याच्या बातम्या म्हणजे निव्वळ पेरलेल्या बातम्या आहेत, हे स्पष्ट होत आहे. पक्षाचे प्रभारी दिग्विजय सिंग यांच्याशी आपण नित्य संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी हायकमांडने माझ्यावर सोपविली आहे आणि मी ती पार पाडत आहे, असे त्यांनी सांगितले. आलेक्स सिक्वेरा यांच्या निलंबनाबद्दल त्यांनी सांगितले की, त्यांच्याविरुद्ध आलेक्स रेजिनाल्ड यांनी तक्रार केली होती. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात, म्हणजेच रेजिनाल्ड यांच्या विरोधात त्यांनी काम केले होते, अशा तक्रारी होत्या. या तक्रारीत तथ्यही आढळून आले आहे. त्यांच्याकडे या बाबतीत स्पष्टीकरणही मागितले होते. निलंबनाचा निर्णय हा सर्व सोपस्कार करूनच घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा पुतळा गोवा विधानसभा संकुलात उभारण्यात यावा आणि त्यासाठी सभापतीने संमती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. (प्रतिनिधी)