सनबर्न बंद पाडणारच, मला भांडल्याशिवाय काही मिळत नाही: प्रवीण आर्लेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2024 12:30 IST2024-12-04T12:30:26+5:302024-12-04T12:30:26+5:30

तीन दिवसांत टॅक्सीवाले किती कमावणार? ३० स्टॉल्स देणार असे सांगतात, तेथे बसून बटाटेवडे विकायचे काय?

sunburn is about to stop i do not get anything without a fight said pravin arlekar | सनबर्न बंद पाडणारच, मला भांडल्याशिवाय काही मिळत नाही: प्रवीण आर्लेकर

सनबर्न बंद पाडणारच, मला भांडल्याशिवाय काही मिळत नाही: प्रवीण आर्लेकर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'सनबर्नला पंचायतीने लोकांचा विरोध डावलून परवानगी दिली असली तरी हा ईडीएम आम्ही धारगळला होऊ देणार नाही, म्हणजे नाही. प्रत्यक्षात जेव्हा हा ईडीएम सुरू होईल, तेव्हा आत घुसून मी तो बंद पाडीन' असा इशारा पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिला आहे. 'लोकमत'शी बोलताना त्यांनी याबाबत आपली आक्रमक भूमिका पुन्हा स्पष्ट केली.

सनबर्नला नक्की का विरोध केला जातोय? या प्रश्नावर आर्लेकर म्हणाले की, 'पेडणे मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठीचा राखीव मतदारसंघ आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण लोकांना दिली, तीत ईडीएम वगैरे स्वैराचार, धांगडधिंगाणा, नशाबाजी या गोष्टी मुळीच बसत नाहीत. ईडीएममध्ये अति ड्रग्स सेवनामुळे तरुण मृत्युमुखी पडण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. मी माझ्या मतदारसंघात हा सनबर्न स्वीकारूच शकत नाही.'

सनबर्न झाल्यास पेडणेतील टॅक्सीवाल्यांना धंदा मिळेल, स्थानिकांसाठीही व्यवसायाच्यादृष्टीने ते फायद्याचे ठरणार नाही का? या प्रश्नावर आर्लेकर म्हणाले की, 'ड्रग्सचा वगैरे वापर होणाऱ्या ईडीएमच्या माध्यमातून आम्हाला कोणतीही कमाई नको. तेथे ३० स्टॉल्स देणार आहेत, तेथे बसून पेडणेवासीयांनी बटाटेवडे विकायचे काय? तीन दिवस ईडीएम चालणार. या तीन दिवसांत टॅक्सीवाले कमावणार तरी किती? ईडीएमच्या काळात टॅक्सीवाल्यांची दिवशी १० ते १५ हजार रुपयांपेक्षा जास्त कमाई होऊच शकत नाही. ही कमाई वर्षभर पुरणार का? या एवढ्या कमाईसाठी पेडण्यात ड्रग्सचा महापूर आणण्याची वाट मोकळी करूया का?' आदी संतप्त सवाल त्यांनी केले. आर्लेकर म्हणाले की, 'स्थानिकांना या ईडीएमचा कोणताही फायदा होणार नाही. आयोजक बाहेरून बाउन्सर्स आणतील. लाखो लोक ईडीएमसाठी येतील व मोठ्या प्रमाणात कचरा करून जातील. हा कचरा नंतर आम्ही उचलावा का? 'आर्लेकर म्हणाले की, 'मी सरकारात असूनही कोणतीच गोष्ट मला भांडल्याशिवाय मिळालेली नाही. टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे लागले. धारगळला फ्लायओव्हरच्या प्रश्नावर आंदोलन करावे लागले. आता सनबर्नच्या प्रश्नावरही मी लोकांसोबत रस्त्यावर उत्तरेन,

कोणीही विश्वासात घेतलेले नाही 

पंचायतीने सरकारच्या दबावाखालीच परवानगी दिली आहे. तुम्हीही या सरकारमध्ये आहात. असे असताना रस्त्यावर उतरण्याची वेळ का यावी? या प्रश्नावर प्रवीण आर्लेकर म्हणाले की, मी सरकारमध्ये असलो तरी सनबर्नबाबत मला कोणीही विश्वासात घेतलेले नाही. आम्हाला धारगळमध्ये सनबर्न नको म्हणजे नको. मी एकदा नाही म्हटले की भूमिका कायम ठेवतो. सनबर्नला विरोधाच्या माझ्या भूमिकेत कोणताही बदल होणार नाही. पंचायतीने परवानगी दिली असली तरी प्रत्यक्षात जेव्हा हा ईडीएम सुरू होईल, तेव्हा आत घुसून मी तो बंद पाडीन.'

सरकार एवढे आग्रही कशाला?

दरम्यान, सनबर्न महोत्सव आयोजित करण्यास मान्यता दिली जाणार नाही, असे सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केले. पण, सरकारने अचानक विचार बदलला आणि सरकारशी निगडीत काही राजकारणी 'सनबर्न'च्या आयोजनासाठी जमीन शोधू लागले. शेवटी त्यांना धारगळची जागा सापडली. त्यांनी एका कॅसिनो मालक कंपनीशी चर्चा करून सनबर्नला धारगळ येथे जागा मिळवून दिली. याबाबत धारगळच्या स्थानिक संस्कृतीप्रेमी लोकांमध्ये संताप आहे. सरकार एवढे आग्रही कशाला ? असे लोक विचारतात.

पेडणे तालुक्यात एकूण दोन आमदार आहेत. त्यापैकी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी तूर्त शांत भूमिका घेतली आहे. ते सरकारसोबत आहेत. पण पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे. सनबर्नच्या आयोजकांना धारगळमध्ये जेवढा इंटरेस्ट आहे, त्याहून जास्त इंटरेस्ट गोवा सरकारमधील काही राजकारण्यांना आहे. आमदार आर्लेकर यांनाही याची कल्पना आली आहे.

सरकारमधील काही राजकारणी धारगळमध्येच सनबर्न व्हायला हवा या मताचे आहेत. आतील बातमी अशी की तीन दिवस धारगळमध्ये जी जंगी पार्टी होईल, त्याद्वारे एकूण शंभर कोटींच्या आसपास उलाढाल होणार आहे. सनबर्नमुळे गोवा सरकारच्या तिजोरीत किती पैसा शुल्क व कराच्या रूपात जमा होईल, या प्रश्नाचे उत्तर अजून गोवा सरकारने कुणाला दिलेले नाही.
 

Web Title: sunburn is about to stop i do not get anything without a fight said pravin arlekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.