संजय सिंह यांच्याविरोधात शंभर कोटींचा दावा; डिचोली न्यायालयात सुलक्षणा सावंत यांच्याकडून खटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2024 12:15 IST2024-12-18T12:13:54+5:302024-12-18T12:15:37+5:30
१० जानेवारी रोजी दु. २.३० वाजता हजर राहण्याचे आदेश

संजय सिंह यांच्याविरोधात शंभर कोटींचा दावा; डिचोली न्यायालयात सुलक्षणा सावंत यांच्याकडून खटला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'कॅश फॉर जॉब'वरून बदनामी केल्याप्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी तथा भाजप नेत्या सुलक्षणा सावंत यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता तथा राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्याविरोधात १०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
डिचोली न्यायालयात सुलक्षणा सावंत यांनी हा दावा दाखल आहे. त्यानुसार डिचोली न्यायालयाने सिंह यांना नोटीस बजावून १० जानेवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत.
आपचे नेते संजय सिंह यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या पत्नीवर 'कॅश फॉर जॉब 'वरून गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सुलक्षणा सावंत यांनी हा खटला दाखल केला आहे. यात सिंह यांनी माफी मागणे, तसेच त्यांच्यावर अशा प्रकारची कुठलीही वक्तव्ये करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर म्हणाले, संजय सिंह यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री व त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा मुद्यामहून प्रयत्न केला. बिनबुडाचे आरोपही त्यांनी केले. अबकारी धोरण घोटाळा तसेच अन्य काही प्रकरणात ते स्वतः अडकले आहेत. त्यांनी अनेक अब्रूनुकसानीच्या खटल्यांमध्ये माफीही मागितली आहे. त्यामुळे आपल्याला काहीच फरक पडत नाही, असे सिंह दाखवत आहेत. सिंह यांनी कुठलेही तथ्य तपासून न पाहता तसेच पुरावे नसताना आरोप केल्याचे ते म्हणाले.