रेल्वे दुपदरीकरणाला काँग्रेसनेच दिलेली मंजुरी; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 09:51 IST2025-09-04T09:49:59+5:302025-09-04T09:51:38+5:30
रेल्वे अधिकाऱ्यांनी दुपदरीकरणाच्या कामाची माहिती देताना यामुळे कोळसा वाहतूक सुलभ होणार असल्याचे म्हटले होते.

रेल्वे दुपदरीकरणाला काँग्रेसनेच दिलेली मंजुरी; वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात सुरू असलेल्या रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाविरोधात आंदोलन करणारा काँग्रेस पक्षच याला जबाबदार आहे असा आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी मंत्रालयात केला.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दुपदरीकरणाच्या कामाची माहिती देताना यामुळे कोळसा वाहतूक सुलभ होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला. यावर ढवळीकर म्हणाले, रेल्वे दुपदीकरणासाठी तयार करण्यात आलेला डीपीआर हा काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात २००८-२००९ साली मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे आज या प्रकल्पाविरोधात आवाज उठवणाऱ्यांनीच त्यावेळी या योजनेस मान्यता दिली होती. काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावेळी याला विरोध का केला नाही?
'राज्यातील काही संघटना व नागरिक रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. पर्यावरण, जनजीवन आणि स्थानिकांच्या हितांवर परिणाम होणार असल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र हा प्रकल्प काँग्रेस सरकारच्या काळातच मार्गी लागला होता. आता या प्रकल्पावर टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवावी, असेही ढवळीकर म्हणाले.