लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुसळधार पावसाचा जोर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही कायम राहिल्याने लोकांची दैना उडाली. अनेक ठिकाणी पडझडही झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह वीजपुरवठा खंडित झाला. म्हालवाडा-पैंगीण येथे निराधार महिलेच्या घरावर फणसाचे झाड कोसळून घर जमीनदोस्त झाले. पावसाचा जोर वाढल्याने धबधब्यांवर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.
वेधशाळेने बुधवारी पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. ताशी ५० ते ६० किलोमिटर वेगाने वारे वाहतील व हा वेग ताशी ७० किलोमीटरपर्यंतदेखील पोहचू शकतो, असे म्हटले आहे. तोरसे येथे प्राथ. शाळेच्या इमारतीवर आंब्याच्या झाडाची फांदी कोसळली. सध्या शाळांना सुटी असल्याने अनर्थ टळला. करमळी येथे दुकानावर झाड कोसळल्याने हानी झाली. चिंबल येथे मारुती मंदिराजवळ घरावर झाड कोसळले. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात पेडणे व म्हापशात तब्बल सहा इंचापेक्षा जास्त पाऊस झाला. अनेक भागांमध्ये नाले, नद्यांची पातळी वाढली आहे. धबधब्यांवर पाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.
पावसांचे थैमान बुधवारीही कायम ठेवताना राज्याला झोडपून काढले. रात्री उशिरापर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दोन दिवसांत मान्सूनपूर्व पावसाची ८ इंच इतकी झाली आहे. उत्तरेत पेडणे आणि म्हापसा भागात आतापर्यंत ५ इंच पावसांची नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या पहिल्याच दणक्याने म्हापसा पालिका प्रशासनाचा कारभार उघड झाला आहे. खोलींतून म्हापशातील तार नदीपर्यंत जाणाऱ्या मुख्य गटाराची तसेच मारुती मंदिर परिसर गटाराची साफ सफाई न केल्याने उसपकर जंक्शनवर पाणी साचले. विशेष म्हणजे कधीही पाणी न भरणाऱ्या अलंकार परिसरात, धुळेर, शहरातील बाजारपेठेत, खोर्ली, अन्साभाट, तळीवाडा, कुचेली, परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. पावसाच्या पाण्याबरोबर म्हापसा शहरातील अनेक ठिकाणचे रस्तेच वाहून गेले आहेत.
१० वाहनांचे नुकसान
पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी एक मोठे आंब्याचे झाड कोसळले. त्यामुळे परिसरात उभ्या असलेल्या १० हून अधिक दुचाक्यांचे मोठे नुकसान झाले. वास्को येथे सडा उड्डाणपुलावर भूस्खलन झाले.
आज, उद्या ऑरेंज अलर्ट
राज्यात पावसाचा जोर वाढत आहे. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने ठिकठिकाणी मुसळधार हजेरी लावली. त्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
'दुधसागर'वर नो एन्ट्री
वनमंत्री विश्वजित राणे यांनी पर्यटक तसेच स्थानिकांना धबधब्यावर जाऊ नये, असे आवाहन केले असून दुधसागर धबधब्यावर प्रवेश बंद केला आहे. पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढला असल्याने खडक निसरडे झाल्याने धबधब्यांवर कोणीही जाऊ नये, असे आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे.