सशक्त स्त्रिया सुदृढ परिवाराचा पाया; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 13:53 IST2025-09-18T13:52:47+5:302025-09-18T13:53:48+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस वाळपईत उत्साहात साजरा

सशक्त स्त्रिया सुदृढ परिवाराचा पाया; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : वयाच्या ७५ च्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अखंडपणे दीडशे कोटी जनतेची सेवा करण्यास तत्पर आहेत. महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी 'नारी सन्माना'च्या विविध योजना कार्यान्वित केलेल्या आहेत. घरातील सशक्त स्त्रिया सुदृढ परिवाराचा पाया आहे. घरातील स्त्री आजारी पडली तर ते कुटुंबच आजारी पडते. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या सुदृढ नारी सशक्त परिवार, महिला कल्याणच्या, महिला सन्मानाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
वाळपई कदंबा बसस्थानक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सबलीकरण व सेवा पंधरवडा या कार्यक्रमामध्ये मंत्री राणे बोलत होते. यावेळी पंतप्रधानांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मध्यप्रदेश येथून दृकश्राव्य पद्धतीने थेट प्रक्षेपित करण्यात आला होता.
तद्नंतर दुर्गा मूर्तींचे पूजन व सामुदायिक आरती करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी उत्तम आयुष्य व आरोग्य लाभो, अशी प्रार्थना आरोग्यमंत्री राणे यांनी केली. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे, केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकारी, गोवा आरोग्य खात्याचे विविध अधिकारी, सरपंच पंचसदस्य व हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले की, घरातील स्त्री ही कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी सज्ज असली पाहिजे. यासाठी त्यांचे आरोग्य जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहेत. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
...तरच देशाचे भवितव्य उज्ज्वल
'स्वस्थ्य नारी, सशक्त परिवार' हा मूलमंत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील गोरगरीब महिला शक्तीचा सन्मान करून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून आरोग्य शिबिरांचे विविध राज्यांत आयोजन करण्यात आलेले आहे. आपल्या घरातील स्त्री ही नुसती चूल व मूल बघत नाही, तर ती स्वतःच्या नवऱ्याचा आधार असते. येणारी पुढील पिढी घडविण्याचे कार्य ती अखंड करीत असते. प्रत्येक घरातील स्त्री सशक्त झाली तर आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नमूद केले.