गोव्यात पहाटेपर्यंत शॅक उघडे ठेवणा-यांवर कडक कारवाई, पर्यटनमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 19:35 IST2018-03-02T19:35:37+5:302018-03-02T19:35:37+5:30
किना-यांवर रात्री उशिरापर्यंत आणि कित्येकदा पहाटेपर्यंत शॅक उघडे ठेवणा-यांविरुध्द कडक कारवाईचा इशारा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला आहे. रात्री १0 नंतर शॅक उघडे ठेवण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास गय केली जाणार नाही, असे आजगांवकर यांनी बजावले आहे.

गोव्यात पहाटेपर्यंत शॅक उघडे ठेवणा-यांवर कडक कारवाई, पर्यटनमंत्र्यांचा इशारा
पणजी : किना-यांवर रात्री उशिरापर्यंत आणि कित्येकदा पहाटेपर्यंत शॅक उघडे ठेवणा-यांविरुध्द कडक कारवाईचा इशारा पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी दिला आहे. रात्री १0 नंतर शॅक उघडे ठेवण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास गय केली जाणार नाही, असे आजगांवकर यांनी बजावले आहे.
बागा, सिकेरी किनारपट्टीतील शॅक पहाटेपर्यंत चालतात आणि कर्णकर्कश संगीतही चालू असते व त्याचा उपद्रव स्थानिक रहिवाशांना होतो, अशा तक्रारी मंत्र्यांकडे आल्या होत्या. राज्याच्या इतर भागातही किना-यांवर असेच प्रकार चालतात. पर्यटन खात्याच्या अधिका-यांना अशा बाबतीत कठोर कारवाईचे आदेश मंत्र्यांनी दिले असून कर्तव्यात कसूर करणा-या अधिका-यांचीही गय केली जाणार नाही. जबाबदार धरुन त्यांच्यावरही कारवाई होईल, असा इशारा दिला आहे.
शॅक धोरणातील मार्गदर्शक तत्त्वे तसेच नियम प्रत्येक शॅकमालकाने पाळायला हवेत, असे मंत्री आजगांवकर म्हणाले. उत्तर गोव्याच्या किनारपट्टीवर उल्लंघनाचे अधिकाधिक प्रकार आढळून आलेले आहेत. परंतु केवळ उत्तरेतच नव्हे तर राज्यातील सर्व पर्यटनस्थळांवर सरकारची करडी नजर असेल. पोलिसांनाही दक्ष राहण्यास बजावण्यात आले आहे.
बागा-सिकेरी पट्ट्यात शॅकमालक गैर वागत असतील तर कोणाचीही तमा न बाळगता कारवाई करु, असे त्यांनी म्हटले आहे. पर्यटनाच्या बाबतीत गोव्याच्या प्रतिमेला बाधा येईल, असे कोणतीही गोष्ट खपवून घेतली जाणार नाही, असे आजगांवकर यांनी स्पष्ट केले. राज्यात सुमारे ३५0 शॅक आहेत. किना-यांवरील हे शॅक देश, विदेशी पर्यटकांचे मोठे आकर्षण असून अनेकजण शॅकमध्ये खानपानास पसंती देत असतात. शॅकमध्ये कर्णकर्कश आवाजात संगीतही चालते.