पुतळ्य़ांचे ठराव फेटाळलेच, सभापतींकडून शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 21:51 IST2018-02-12T21:51:18+5:302018-02-12T21:51:24+5:30
पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पासमोर स्व. जॅक सिक्वेरा, राम मनोहर लोहिया, टी. बी. कुन्हा, छत्रपती शिवाजी यांचे पुतळे उभे केले जावेत म्हणून विविध पक्षांच्या आमदारांनी सादर केलेले खासगी ठराव विधानसभा कामकाजाचा भाग होणार नाही हे सोमवारी अधिक स्पष्ट झाले.

पुतळ्य़ांचे ठराव फेटाळलेच, सभापतींकडून शिक्कामोर्तब
पणजी - पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पासमोर स्व. जॅक सिक्वेरा, राम मनोहर लोहिया, टी. बी. कुन्हा, छत्रपती शिवाजी यांचे पुतळे उभे केले जावेत म्हणून विविध पक्षांच्या आमदारांनी सादर केलेले खासगी ठराव विधानसभा कामकाजाचा भाग होणार नाही हे सोमवारी अधिक स्पष्ट झाले. हे ठराव विधानसभेत येण्यापूर्वीच फेटाळण्यावर सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या अधिकारांच्या कक्षेत राहून शिक्कामोर्तब केले. ठराव बाद ठरल्याचे वृत्त लोकमतने गेल्या शनिवारी सर्वप्रथम दिले होते.
विधानसभा प्रकल्पासमोर मुक्त गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा आहे. तिथे जनमत कौल चळवळीत योगदान दिलेले स्व. ज्ॉक सिक्वेरा यांचाही पुतळा उभा केला जावा अशी मागणी सत्तेत सहभागी झालेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाने आणि भाजपचे आमदार मायकल लोबो यांनीही अलिकडे केली व वाद सुरू झाला. मगोपचे आमदार दिपक प्रभू पाऊसकर यांनी विधानसभेसमोर स्व. लोहिया व टी. बी. कुन्हा यांचा पुतळा उभा केला जावा असा ठराव विधिमंडळ खात्याला सादर केला. भाजपचे डिचोलीचे आमदार राजेश पाटणोकर यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशी मागणी करून ठराव आणला. काँग्रेसच्या सोळाही आमदारांनी मिळून विधानसभेसमोर स्व. सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा या मागणीला जोर दिला व आपलाही ठराव सादर केला. एकूण चार पुतळे बांधण्यासाठी ठराव आल्यामुळे हे ठराव विधानसभेत चर्चेसाठी घ्यायचे नाहीत असा निर्णय सभापती डॉ. सावंत यांनी घेतला.
विधानसभेचे क्षेत्र हे सभापतींच्या अखत्यारित येते. तिथे कुणाचा पुतळा असावा किंवा असू नये हे ठरविण्याचा अधिकार सभापतींचा आहे. विधानसभेसमोर स्व. भाऊसाहेब बांदोडकर वगळता अन्य कुणाचा आणखी पुतळा नको, असे यापूर्वी ठरलेले आहे.
पुतळा कधी तरी होईल : विजय
दरम्यान, मंत्री विजय सरदेसाई हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, की जनमत कौलाविषयी आम्ही एकूण तीन मागण्या केल्या होत्या. त्यापैकी दोन मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. अभ्यासक्रमामध्ये जनमत कौलाचा इतिहास शिकविला जावा ही मागणीही सरकारने मान्य केली. जनमत कौल चळवळीत योगदान दिलेल्या सर्वाना सरकारी मान्यता मिळावी व या चळवळीतील एक प्रमुख स्व. सिक्वेरा यांचा पुतळा उभा करावा अशी आमची मागणी होती व आहे. कालांतराने नैसर्गिकपणो कधी तरी ती मागणी पूर्ण होईलच. कारण जनमत कौलाचा इतिहास विद्यार्थी शिकतील. हे विद्यार्थी जेव्हा विधानसभेत येतील तेव्हा ज्यांचा इतिहास आम्ही शिकलो त्यांच्या स्मृती जागविणारे इथे काहीच नाही काय असे विद्यार्थी विचारतील. काळाच्या ओघात मग स्व. सिक्वेरा यांचा पुतळा उभा राहीलच.