वाहनांमुळे प्रदूषणाची स्थिती भयावह
By Admin | Updated: November 24, 2014 01:41 IST2014-11-24T01:22:08+5:302014-11-24T01:41:57+5:30
राज्यातील शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषण आणि पार्किंग याबाबत भयावह स्थिती निर्माण झाली आहे, असे निरीक्षण वाहतूक खात्याने नोंदवले आहे.

वाहनांमुळे प्रदूषणाची स्थिती भयावह
पणजी : राज्यातील शहरांमध्ये वाहनांची संख्या वाढत असल्याने प्रदूषण आणि पार्किंग याबाबत भयावह स्थिती निर्माण झाली आहे, असे निरीक्षण वाहतूक खात्याने नोंदवले आहे.
कदंबच्या पास पद्धतीबाबतची अधिसूचना जारी करताना वाहतूक खात्याने राज्यातील शहरांमधील वाहनांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकला आहे. अधिकाधिक लोक स्वत:च्या दुचाक्या, कारगाड्या व अन्य वाहने वापरतात. वाहनांच्या प्रचंड वापरामुळे वाहतुकीची कोंडी होतेच, शिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अपघात होतात. राज्यातील सर्व शहरी भागांमध्ये प्रदूषणाबाबत आणि पार्किंगबाबत भयावह स्थिती आहे, असे निरीक्षण वाहतूक
खात्याने नोंदवले आहे.
दरम्यान, एका पणजी शहरात दिवसाला किमान साठ हजार वाहने प्रवेश करतात, असे यापूर्वी तिसऱ्या नियोजित मांडवी पुलाविषयी अभ्यास करताना साधनसुविधा विकास महामंडळाच्या काही अधिकाऱ्यांना आढळून आले आहे. प्रत्येक शहरात सकाळी व सायंकाळी वाहनांची प्रचंड गर्दी दिसून येते. सकाळी वाहने शहरात येण्यासाठी व सायंकाळी शहरातून बाहेर जाण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करतात व यामुळे राज्यातील बहुतांश प्रमुख मार्गांवर अपघात होत आहेत. पार्किंगची समस्याही प्रत्येक शहरात जटिल बनली आहे. पणजीपेक्षाही म्हापसा शहरात वाहनांच्या पार्किंगची मोठी समस्या आहे. दुचाकीदेखील नीट पार्क करायला जागा
मिळत नाही, असा अनुभव राज्यातील
सर्वच शहरांमध्ये येऊ लागला आहे.
(खास प्रतिनिधी)