राज्यात पब, बिकिनीवर निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री
By Admin | Updated: July 3, 2014 01:18 IST2014-07-03T01:17:27+5:302014-07-03T01:18:32+5:30
पणजी : राज्यात सरकार नव्याने पर्यटकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादणार नाही. पब संस्कृतीवर किंवा बिकिनींच्या वापरावरही निर्बंध नाहीत. फक्त समुद्रकिनाऱ्यांवर

राज्यात पब, बिकिनीवर निर्बंध नाहीत : मुख्यमंत्री
पणजी : राज्यात सरकार नव्याने पर्यटकांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध लादणार नाही. पब संस्कृतीवर किंवा बिकिनींच्या वापरावरही निर्बंध नाहीत. फक्त समुद्रकिनाऱ्यांवर व अन्य सार्वजनिक ठिकाणी कुणाला दारू पिता येणार नाही. त्यासाठीच्या बंदीची प्रभावीपणे अबकारी खाते अंमलबजावणी करील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर हे जे काही बोलले आहेत, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे. प्रत्येकास मत स्वातंत्र्य आहे. मात्र, ढवळीकर यांचे मत प्रत्येक प्रसारमाध्यमांत वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला व ऐकायला मिळते. मला मंत्री ढवळीकर भेटले व त्यांनी जे काही सांगितले, ते मला आक्षेपार्ह वाटत नाही. राज्यात सध्या पर्यटकांची वेषभूषा किंवा पब संस्कृती ज्या प्रकारे सुरू आहे, त्यास सरकारचा आक्षेप नाही.
सरकारने आपली भूमिका बदललेली नाही. पबच्या बाहेर येऊन मात्र कुणी दारू पिऊ नये. किनाऱ्यांवरही बसून कुणाला दारू पिता येणार नाही. अबकारी खात्याला आपण पथके स्थापन करून अशा प्रकारांविरुद्ध कारवाई करण्यास सांगितले आहे. सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच खुल्या जागेवर काहीजण दारू पिण्यास बसतात आणि बाटल्या तिथेच टाकून जातात.
मुख्यमंत्री म्हणाले की, मद्यालयात जर कुणी दारू पिताना भांडले, तर बारमालकाला जबाबदार धरता येते. त्याबाबत मद्यालयाचा परवानाही निलंबित करता येतो. मात्र, पबमध्ये जाणाऱ्यांनी बाहेर उघड्यावर कुठे दारू पिऊ नये. किनाऱ्यांवरही मद्यप्राशन करू नये. पर्यटकांनी बिकिनी घालून पोहण्यासाठी जाण्यास आक्षेप घेता येणार नाही.
पर्यटकांनी कोणती वेशभूषा करावी, हे सरकार सांगू शकणार नाही. मंदिरात किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी कोणत्या वेशभूषेत जावे, हे प्रत्येकाने ठरवायचे असते. पर्यटक हाफ पॅन्ट घालून सर्वत्र फिरले म्हणून त्यासही आक्षेप घेता येणार नाही.
(खास प्रतिनिधी)