हडफडेतील दुर्घटनेसाठी राज्य सरकारच दोषी; अरविंद केजरीवाल यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:09 IST2025-12-13T13:07:29+5:302025-12-13T13:09:48+5:30
वेळ्ळी, बाणावली, शेल्डे येथील सभांमध्ये सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप

हडफडेतील दुर्घटनेसाठी राज्य सरकारच दोषी; अरविंद केजरीवाल यांची टीका
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : विद्यमान सरकारने १३ वर्षात केवळ भ्रष्टाचारामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. या सरकारच्या काळात चाललेल्या अंदाधुंद भ्रष्ट्राचारामुळे सामान्य लोकांचे जीवन अत्यंत दयनीय झाले आहे, तर मोठे व्यावसायिक आणि भांडवलदार यांची भरभराट झाली. हडफडे येथे झालेल्या आगीच्या दुर्घटनेत २५ लोकांच्या मृत्यूप्रकरणी सरकार दोषी आहे, अशी टीका आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. काल शुक्रवारी जिल्हा पंचायत निवडणुकीनिमित्त वेळ्ळी येथे जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी आपचगोवा प्रभारी आतिशी, बाणावलीचे आमदार व्हेन्झी व्हिएगस, वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, जिल्हा पंचायतीच्या उमेदवार इसाका फर्नाडिस, जोसेफ कार्डोझ यांच्यासह पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी उपस्थित होते. केजरीवाल यांनी शुक्रवारी बाणावली, वेळ्ळी आणि शेल्डे येथे सभा घेतल्या. वेळ्ळी येथे झालेल्या सभेत केजरीवाल यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी पंजाबमधील आप सरकारच्या कामाचा दाखला दिला. पंजाबमध्ये कोणत्याही व्यवसायासाठी परवाना देण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम लागू केली आहे आणि ४५ दिवसांच्या आत परवाना न मिळाल्यास तो मंजूर मानला जातो, पण गोव्यात अशी व्यवस्था नाही, असे ते म्हणाले.
आमदार व्हेन्झी व्हिएगस विधानसभेत टॅक्सी चालकांचे प्रश्न मांडणारे एकमेव आमदार आहेत. टॅक्सी चालकांकडून होणारे कथित अतिशुल्क आणि अॅप-आधारित कॅबला त्यांचा असलेला विरोध हे गोव्याच्या पर्यटन-आधारित अर्थव्यवस्थेतील दीर्घकाळचे मुद्दे आहेत.
जिल्हा पंचायत निवडणुकीत लोकांनी आपच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आणि २०२७ मध्ये गोव्यात आपचे सरकार स्थापन करण्यास मदत करण्याचे आवाहन केले. अतिशी यांनी, आपच्या दोन्ही आमदारांनी गरजू लोकांना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे चांगले कार्य केल्याचे नमूद केले.
शेल्डेतील सभेला आपच्या गोवा प्रभारी आतिशी, राज्य निमंत्रक अॅड. अमित पालेकर, आमदार व्हिएगस, राज्याचे कार्यकारी अध्यक्ष गर्सन गोम्स, उपाध्यक्ष रॉक मास्करेन्हास, मोहीम सरचिटणीस संदेश तेलेकर देसाई, झेडपी उमेदवार फर्नाडिस (शेल्डे), तेजस्विनी गावकर (रिवण), संजीवनी वेळीप (बार्से), शशिकांत वेळीप (धारबांदोडा) आदी उपस्थित होते. अरविंद केजरीवाल यांनी आमदार व्हिएगस, आमदार सिल्वा यांच्या कामाचे कौतुक केले.
'विद्यमान सरकार हफ्तावसुलीचे'
शेल्डे येथील सभेत केजरीवाल म्हणाले, की येथील राज्य सरकार हे फक्त हप्ता वसुली सरकार आहे. कारण हप्ता आणि लाच घेतल्याशिवाय कोणतेच काम होत नाही. त्यांचे उदाहरण म्हणजे हडपडेची घटना. ज्याला कुठल्याही परवानग्या नव्हत्या असा क्लब सुरू होता. याचा अर्थ हा क्लब चालवण्यासाठी सरकारला हप्ता मिळत होता म्हणून हे सरकार हप्ता वसुली सरकार आहे. ही सभा आपचे उमेदवार जेम्स फर्नाडिस यांच्या प्रचारासाठी आयोजित केली होती.
गुंडांकडून लोकांना धमक्या
केजरीवाल म्हणाले, गुंड खुलेआम लोकांना धमक्या देतात. आमच्या कार्यकर्त्यांनाही धमक्या देतात. सामान्यांची नोकरी काढून घेण्याची भाषा करतात. आप गोमंतकीयांचा आवाज आहे आणि आम्ही कुणाला घाबरत नाही. गोमंतकीयांनी एकत्र येऊन भाजपला सत्तेतून हटवण्याचे काम करावे.
टॅक्सीचालक हे पर्यटनाचे 'ब्रँड अॅम्बेसिडर'
बाणावलीतील सभेत केजरीवाल म्हणाले, की राज्य टॅक्सीचालक 'पर्यटनाचे ब्रँड अॅम्बेसिडर' आहेत. टॅक्सीचालकांच्या प्रामाणिक रोजगारात सरकारने अडचणी निर्माण केल्या. राज्यात 'आप'चे सरकार आल्यास टॅक्सीचालकांना प्रामाणिकपणे जीवन जगता येईल.
सत्तेत येणारे सरकार टॅक्सीचालकांना चुकीचा मार्ग स्वीकारायला लावते आणि नंतर त्यांना त्रास देते. टॅक्सी स्टैंड्स हा गोव्याच्या संस्कृतीचा भाग आहेत आणि टॅक्सीचालक हे गोव्याच्या पर्यटन उद्योगाचे 'ब्रँड अॅम्बेसिडर' आहेत.