विशेष संपादकीय: गोंयकारांचा आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 08:02 IST2025-05-21T08:02:09+5:302025-05-21T08:02:43+5:30

लोकमतची गोवा आवृत्ती २००९ साली सुरू झाली. गोव्यात सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून अल्पावधीत लोकमतची ओळख निर्माण झाली हे सांगताना खूप अभिमान वाटतो. 

special editorial goa lokmat newspaper is the voice of goans | विशेष संपादकीय: गोंयकारांचा आवाज

विशेष संपादकीय: गोंयकारांचा आवाज

लोकमतचीगोवा आवृत्ती २००९ साली सुरू झाली. लोकमत अगदी दणकेबाज येतोय, सत्तेत कुणीही असले तरी पर्वा करत नाही, लोकमत लोकांचीच बाजू घेतोय, असा अनुभव सर्व गोमंतकीयांना गेल्या सोळा वर्षांत आला. त्यामुळेच गोंयकारांचा पूर्ण विश्वास प्राप्त करण्यात लोकमत यशस्वी ठरला. वाचकांची मने जिंकणे म्हणजे काय असते, हे लोकमतच्या कुजबुजने आणि राजकीय बातम्यांनी दाखवून दिले आहे. गोव्यात सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून अल्पावधीत लोकमतची ओळख निर्माण झाली हे सांगताना खूप अभिमान वाटतो. 

लोकमतमध्ये बातमी आली की राज्यभर चर्चा होते. सरकारी पातळीवर जोरदार पडसाद उमटतात. मुख्यमंत्री व अन्य मंत्री, आमदार दखल घेतात आणि मग जनतेची समस्या सुटण्याचा मार्ग खुला होतो. स्पर्धेच्या युगात लोकमत केवळ टिकूनच राहिला असे नव्हे तर स्वतःचा व्याप देखील वाढवत राहिला. वाचक आणि हितचिंतकांच्या बळावरच हे शक्य झाले. लोकमतचे इव्हिनिंग बुलेटिन मिळाले नाही तर अस्वस्थता येते, असे सांगणारे वाचक भेटतात. लोकमतची ब्रेकिंग न्यूज वाचायला प्राप्त झाली नाही तर काही तरी उणीव राहिल्यासारखे वाटते, असा अनुभव लोक सांगतात. लोकमतच्या संपादकीय पानावर आणि रविवार पुरवणीत गोव्यातील नामवंत आणि नवोदित लेखक सतत लिहित राहिले. काहीजणांनी लेखांची पुस्तके काढली, तेव्हा लोकमतला अधिक आनंद झाला.

समाजाच्या सर्व स्तरांवरील लोकांनी आपुलकी, स्नेह आणि निर्व्याज प्रेम दिल्यानेच आम्ही आज इथपर्यंत मजल मारू शकलो. तुमचा लोकमत पेपर पक्षपाती भूमिका घेत नाही, तो एकांगी किंवा एकतर्फी कधीच झाला नाही असे मराठीवादी व कोंकणीवादी सांगतात तेव्हा ऊर भरून येतो. भाजप किंवा काँग्रेस किंवा अन्य पक्षांच्या सर्वच समर्थकांच्या बातम्यांना समान स्थान आम्ही देत आल्यानेच वाचकांचा विश्वास दृढ झाला.

गोवा आवृत्तीने आता सतराव्या वर्षात पाऊल टाकले आहे. गोव्यातील बेकायदा खाणींविरुद्ध झालेली चळवळ, म्हादई पाणीप्रश्नी चाललेला लढा, काही वर्षांपूर्वी वानरमाऱ्यांच्या कल्याणासाठी झालेली छोटी चळवळ, कुळ-मुंडकारांना न्याय मिळावा म्हणून किंवा गोव्याचा निसर्ग, शेती वाचविण्यासाठी अधूनमधून होणारी आंदोलने, शिक्षण माध्यमप्रश्नी झालेली चळवळ किंवा मध्यंतरी गाजलेले नोकरीकांड अशा अनेक विषयांबाबत लोकमतने कायम जनतेची साथ दिली.

वीरेश बोरकरसारखे विरोधी आमदार बांबोळीतील बेकायदा प्रकल्पांविरुद्ध लढले तेव्हा त्याबाबत संपादकीय लिहूनही बोरकर यांना पाठिंबा दिला. विधानसभेत विरोधी काँग्रेस, आप किंवा गोवा फॉरवर्ड आमदारांनी जनतेचे प्रश्न मांडले तेव्हा त्या विषयांना ठळक प्रसिद्धी देण्याचेही काम लोकमतने केले. सरकारने एखादा चांगला निर्णय घेतला तर त्याचे स्वागत करायचे व घोटाळे केले तर आसूड ओढायचे असा मार्ग लोकमतने कायम स्वीकारला आहे. 

समाजातील शोषित, पीडित घटकांवर अन्याय झाल्याचे दिसून आले की त्याबाबत लोकमतने लिहिलेच म्हणून समजावे. गेले वर्षभर आम्ही फोटो सदर चालवत आहोत. रस्त्याच्या बाजूला किंवा मंदिर परिसरात उभी राहून जी माणसे फळे, फुले, भाजी विकतात किंवा जी गरीब माणसे ऊन पावसाची पर्वा न करता विविध प्रकारचे कष्ट करतात, त्यांचे फोटो जाणीवपूर्वक विशेष सदरात प्रसिद्ध केले जातात. 'माझे काम, माझा दिवस' हे सदर लोकप्रिय झाले आहे.

केवळ सेलेब्रिटिंचेच फोटो लोकमतमध्ये येतात असे नाही तर रस्त्याच्या कडेला टायर पंक्चर काढणारे, स्कूटर दुरुस्त करणारे तरुण, माडावर चढून नारळ पाडणारे पाडेली अशा सर्वांचीच छायाचित्रे प्रकाशित केली जातात. गोव्यात होणारे सगळे उत्सव सचित्र लोकमतमध्ये बातम्यांच्या रूपात अनुभवास येतात. मोटरसायकल पायलट, खासगी बस व्यावसायिक यांच्यापासून काजू, सुपारी लागवड करणारे छोटे शेतकरी या सर्वांच्या व्यथा लोकमतमधून मांडल्या जातात. मराठी व कोंकणी लेखकांना समान स्थान देत लोकमत अस्सल गोंयकार झालेला आहे.

थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल (बाबूजी) दर्डा यांनी महाराष्ट्रात लोकमत दैनिक सुरू केले. महाराष्ट्रासह दिल्ली व गोव्यातही लोकमत वाढला. जिथे जिथे लोक आहेत, तिथे तिथे 'लोकमत' पोहोचला आहे. 'गोवन ऑफ द इयर'सारखे पुरस्कार सोहळे आयोजित करणे ही तर सोनेरी अक्षरांनी लिहिण्यासारखी कृती झालेली आहे. गोवा लोकमत आज वर्धापन दिन साजरा करतोय. लोकमत कायम जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडत राहील. हे व्रत कधी थांबणार नाही, अशी हमी आम्ही आज पुन्हा येथे देतो व थांबतो.

 

Web Title: special editorial goa lokmat newspaper is the voice of goans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.