आश्वासनांवर बोळवण

By Admin | Updated: June 15, 2014 01:18 IST2014-06-15T01:17:01+5:302014-06-15T01:18:32+5:30

पणजी : गोव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रकारच्या घोषणा करतील, असे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात वरवरची आश्वासने तेवढी गोमंतकीयांना मोदी यांच्याकडून ऐकायला मिळाली.

Speaking on Assurances | आश्वासनांवर बोळवण

आश्वासनांवर बोळवण

पणजी : गोव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक प्रकारच्या घोषणा करतील, असे अपेक्षित होते; पण प्रत्यक्षात वरवरची आश्वासने तेवढी गोमंतकीयांना मोदी यांच्याकडून ऐकायला मिळाली. गोव्याला खास दर्जा, दुहेरी नागरिकत्वाच्या तिढ्यावर तोडगा किंवा राज्याला मायनिंग पॅकेज देण्याविषयी पंतप्रधानांनी काहीच आश्वासन दिले नाही. खाण व्यवसाय नव्याने सुरू करणे, जुवारी नदीवर पूल बांधणे या केवळ दोन विषयांबाबत पंतप्रधानांनी वरवरची आश्वासने देत बोळवण केली. गोव्याबाबत आपल्याला असलेले प्रेम तेवढे त्यांनी बोलून दाखवत गोव्याला कोणत्याही बाबतीत पाठिंबा देऊ, असे विधान केले. त्यामुळे गोमंतकीयांना ‘अच्छे दिन’साठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गोव्याबाबत अनेक महत्त्वाच्या घोषणा प्रत्यक्ष पंतप्रधानांकडूनच ऐकायला मिळतील, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही चार दिवसांपूर्वी म्हटले होते. केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर गोव्याला खास दर्जा निश्चितच मिळेल, अशा प्रकारची हवा तयार केली गेली होती. पंतप्रधान गोवा भेटीवर आल्यानंतर खास दर्जाच्या गोमंतकीयाच्या मागणीविषयी भाष्य करतील, गोव्यातील खनिज व्यवसाय लगेच सुरू करण्याविषयी ठोस असे एखादे विधान करतील, असे अपेक्षित होते. मात्र, खास दर्जाबाबत ते काहीच बोलले नाहीत. गोव्यातील समस्यांची आपल्याला जाण असून खाण व्यवसाय लवकर सुरू व्हावा म्हणून विविध खात्यांना आपण सूचना केल्या आहेत, एवढेच मोदी म्हणाले. गोव्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने गोव्याला विशेष मायनिंग पॅकेज दिले जाईल, खाणग्रस्त भागातील लोकांची कर्जे रिझर्व्ह बँकेकडून माफ केली जावीत, या दृष्टिकोनातून मोदी काही तरी बोलतील, असेही लोकांना वाटत होते; पण त्या विषयांना पंतप्रधानांनी स्पर्शही केला नाही. त्यामुळे त्याबाबत अपेक्षाभंगच वाट्याला आला. पंतप्रधानांचे गोव्यात चार सोहळे पार पडले. सर्व ठिकाणी मोदी गोव्याविषयी फक्त मोघमपणे बोलले. त्यात एकही ठोस आश्वासन नव्हते.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Speaking on Assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.