दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुविधांनी सुसज्ज करणार; आरोग्यमंत्री विश्वजित राणेंची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 07:24 IST2025-11-07T07:22:40+5:302025-11-07T07:24:16+5:30
न्यूरॉलॉजी कक्ष लवकरच : मालभाट येथे आरोग्य केंद्राचे उद्घाटन, विरोधकांवर साधला निशाणा

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ सुविधांनी सुसज्ज करणार; आरोग्यमंत्री विश्वजित राणेंची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : २०२७च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ न्यूरॉलॉजी कक्ष व इतर सर्व सुविधांनिशी सुसज्ज करणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल गुरुवारी दिली. तसेच राज्यभर 'स्टेट केअर्स' हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मालभाट-मडगाव येथे शहरी आयुष्यमान आरोग्य केंद्राचे काल गुरुवारी मंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी मंत्री राणे बोलत होते.
या वेळी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत, मडगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी मधु नार्वेकर, आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, मडगाव आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. बाप्तिस्ता मास्कारेन्हास व इतर मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, सध्या या इस्पितळात सुविधांचा अभाव असल्याची टीका काही विरोधक करतात. स्थानिक आमदार या नात्याने दिगंबर कामत यांना जिल्हा इस्पितळावरून टार्गेट केले जाते. मात्र, लवकरच विरोधकांना बोलण्याची संधीच मिळणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या इस्पितळात 'न्यूरॉलॉजी कक्ष, ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. आपण लोकांना चांगल्या वैद्यकीय सेवा देण्यासाठी कायमच तत्पर असतो. अनेक सुधारणा इस्पितळात केल्या आहेत, असेही मंत्री राणे म्हणाले. दरम्यान, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
आरोग्य क्षेत्रात मंत्री विश्वजित राणे यांनी कौतुकास्पद कार्य केले आहे. जिल्हा इस्पितळात सर्व आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा मी मांडला होता आणि त्यानुसार लवकरच त्या सुविधा उपलब्ध होतील, असे मंत्री कामत यांनी सांगितले.
लोकांची सेवा, हे आपले कर्तव्य
लोकांची सेवा करणे आणि त्यांच्या हिताचे निर्णय घेणे हे आमचे कर्तव्य आहे. सरकारने आणलेली 'माझे घर' योजना ही लोकांसाठी लाभदायी आहे. जर कुणी सामान्य व्यक्ती आपले घर जर दुरुस्त करू पाहत असेल तर त्यांना जलद परवाने देण्याची आणि कुठलीही अडचण दूर करण्याचे निर्देश नगरनियोजन खात्यातील अधिकाऱ्यांना मी दिले आहेत, असे मंत्री विश्वजित राणे यांनी स्पष्ट केले.
..तसे सरकार घडविता येत नाही
मंत्री राणे यांनी नाव न घेता काही विरोधी पक्षांवर निशाणा साधला. लोकांना हातात हात घालून हात वर करून दाखवले म्हणून सरकार घडवता येत नाही. हातात हात घालून दाखवणारी हीच मंडळी मग निवडून आल्यानंतर दुसऱ्याच पक्षात दिसतात. फक्त निवडणुकीपूर्वी एकत्र असल्याचे दाखवून लोकांची दिशाभूल करतात. लोकांनी याकडे दुर्लक्ष करावे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.
आयुष्यमान आरोग्य केंद्र हे स्थानिक लोकांसाठी वरदान ठरेल. कुठलीही आरोग्याची समस्या उद्भवल्यास त्याचे निराकरण येथे करण्याचा प्रयत्न केला जाईल. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र हे देशाच्या उन्नतीसाठी महत्त्वाचे असते. -मंत्री दिगंबर कामत.