सख्ख्या बहिणींनी घेतली नदीत उडी
By Admin | Updated: July 22, 2014 07:30 IST2014-07-22T07:25:26+5:302014-07-22T07:30:33+5:30
फोंडा/पर्ये : आमोणा पुलावरून उडी घेतलेल्या दोघा सख्ख्या बहिणींपैकी एकीला वाचविण्यात यश आले आहे. दुसरी बहीण अद्याप बेपत्ता आहे.

सख्ख्या बहिणींनी घेतली नदीत उडी
फोंडा/पर्ये : आमोणा पुलावरून उडी घेतलेल्या दोघा सख्ख्या बहिणींपैकी एकीला वाचविण्यात यश आले आहे. दुसरी बहीण अद्याप बेपत्ता आहे. वाचविण्यात आलेल्या बहिणीचे नाव सुजाता विठ्ठल गावस (१८) असून तिच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. नीता विठ्ठल गावस (२0) हिचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता. मात्र, ती सापडू शकली नाही. या दोन्ही बहिणी गुळ्ळे, न्यू कॉलनी, मोले-सत्तरी येथील असून दोघीही विद्यार्थिनी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास आमोणा पुलावर आपल्या खांद्यावरील बॅगा खाली ठेवून दोन युवतींनी नदीत उडी घेताना तिथे रेती काढणाऱ्या होडीवाल्यांनी पाहिले. त्यानंतर त्या होडीवाल्यांनी लगेच हालचाल करून सुजाता गावस हिला पाण्यातून बाहेर काढले. किनाऱ्यावर आणल्यावर त्वरित तिला गोमेकॉत पाठविण्यात आले. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढल्याने नीता सापडू शकली नाही.
वाचवण्यात आलेली सुजाता गावस ही साखळी येथील सरकारी उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीत शिकत आहे. तर नीता गावस ही साखळीतील सरकारी महाविद्यालयाच्या बीएच्या प्रथम वर्गात शिकत होती.
दुपारी कॉलेज सुटल्यावर घरी न जाता या दोघीही बहिणींनी आमोणा गाठून नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.
फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक सी. एल. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याचा प्रवाह वाढल्याने नीता गावस
वाहून जाण्याची शक्यता आहे. आज मंगळवारी सकाळी पुन्हा तिचा शोध घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)