जगप्रसिद्ध दोनापावल जेटीचा काही भाग पर्यटकांसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:28 IST2018-10-27T13:28:11+5:302018-10-27T13:28:28+5:30
गोव्यातील दोनापावल ह्या जगप्रसिद्ध जेटीचा काही भाग असुरक्षित बनलेला असल्याने तो कोसळू शकतो हे लक्षात घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी जेटीचा हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

जगप्रसिद्ध दोनापावल जेटीचा काही भाग पर्यटकांसाठी बंद
सदगुरू पाटील
पणजी : गोव्यातील दोनापावल ह्या जगप्रसिद्ध जेटीचा काही भाग असुरक्षित बनलेला असल्याने तो कोसळू शकतो हे लक्षात घेऊन उत्तर गोवा जिल्हाधिका-यांनी जेटीचा हा भाग पर्यटकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी लेवीनसन मार्टीन्स यांनी याबाबतचा आदेश जारी केला असून हा आदेश येत्या 5 नोव्हेंबरपासून लागू होत आहे. रोज देश व विदेशातील काही हजार पर्यटक दोनापावलच्या जेटीकडे जात असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत पर्यटकांचे तिथे येणे-जाणे सुरू असते. स्थानिकही अनेकदा जाऊन येतात.
राजधानी पणजीपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेली दोनापावलची जेटी ही वैशिष्टय़पूर्ण आहे. त्या जेटीचा काही भाग कमकुवत झालेला आहे. तो अत्यंत धोकादायक बनल्याने तो भाग बंद केला जात असल्याची कल्पना जिल्हाधिका-यांनी पोलीस खाते, वाहतूक पोलिस, वीज खाते व पणजी महापालिकेसह इमेजिन स्मार्ट पणजी ह्या यंत्रणेलाही दिली आहे. दोनापावल जेटीकडे अजय देवगणच्या सिंघम चित्रपटासह अनेक सिनेमांचे चित्रिकरण झालेले आहे. एके काळी कमल हसन मुख्य भूमिकेत असलेल्या एक दुजे के लिए चित्रपटाच्या चित्रिकरणाने ही जेटी जास्त प्रकाशझोतात आणली. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश आदी भागांतून येणारे देशी पर्यटक तर ह्या जेटीला भेट दिल्याशिवाय माघारी जात नाहीत. या जेटीकडून अरबी समुद्राचे मनोहारी दृश्य दिसते. सूर्यास्ताच्यावेळी येथे हजारो पर्यटक छायाचित्रे काढतात. समुद्राच्या कडेला जाऊन सेल्फी घेतात. काळेशार खडक आणि समुद्राच्या पांढ-याशुभ्र लाटा दोनापावलच्या उंच ठिकाणावरून पाहणे हे खूप आनंददायी असते. कधी खनिज तर कधी अन्य माल घेऊन मोठी जहाजे समुद्रातून जाताना दिसतात. होड्यांद्वारे मासेमारी पहायला मिळते.
दोनापावच्या ज्या जेटीचा भाग बंद केला जात आहे, तिथे पोलिसांनी अधिक लक्ष ठेवावे तसेच तेथील वीज पुरवठा खंडीत करून टाकावा आणि पणजी महापालिकेने तो भाग बंद केल्याचे फलक एनआयओ सर्कलसह अन्य सर्व ठिकाणी लावावेत असे जिल्हाधिका-यांनी बजावले आहे. जेटीकडील विक्रेत्यांना व्यवस्थित दुसरी जागा दिली जावी, जेणेकरून वाहतुकीची समस्या येणार नाही, असेही जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे. आवश्यक बॅरीकेड्स लावावेत व जर कुणी आदेशाचा भंग करून असुरक्षित भागात गेले तर त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 188 कलमाखाली कारवाई करावी,असे जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे.