राजस्थाननंतर गोव्यात होणार माध्यमांची मुस्कटदाबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2017 19:44 IST2017-10-23T19:41:55+5:302017-10-23T19:44:32+5:30
प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा अद्यादेश जो राजस्थानात भाजप सरकारने जारी केला आहे तो डाव यशस्वी झाल्यास गोव्यातही तेच प्रकार घडणार असल्याची भिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केली आहे.

राजस्थाननंतर गोव्यात होणार माध्यमांची मुस्कटदाबी
पणजी - प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा अद्यादेश जो राजस्थानात भाजप सरकारने जारी केला आहे तो डाव यशस्वी झाल्यास गोव्यातही तेच प्रकार घडणार असल्याची भिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी व्यक्त केली आहे.
माद्यमांवर निर्बंध लादणारे कायदे भाजप सरकार देशभर बनवू पाहत आहे. राजस्थानमध्ये सध्या प्रयोग सुरू आहे. राजस्थान सरकारच्या या हरकतीमुळे लोक संतप्त झाले आहेत. परंतु लोकांच्या विरोधाला न जुमानता हुकूमशाही चालविण्याचा सरकारचा डाव दिसत आहे. राजस्थानमध्ये या लोकांचे साधले तर गोव्यातही ते प्रयत्न निश्चितच होतील असे नाईक म्हणाले. राजस्थान सरकारचा अद्यादेश सध्या कायद्याच्या कात्रीत अडकला असून घटनात्मक मुल्यांच्या विरोधात तो असल्याचे त्यांनी सांगितले.
तियात्रवर जीएसटी लावण्याच्या सरकारच्या कृतीचा नाईक यांनी विरोध केला. तियात्र हा गोव्याचा आवडता नाट्य प्रकार आहे. विशेष करून ख्रिस्ती लोकांत हा अत्यंत प्रिय नाट्य प्रकार आहे. तियात्रवर लागू करण्यात आलेला जीएसटी ताबडतोब मागे घेण्यात यावा, मग ते कंपन्यांचे तियात्र असो किंवा खाजगी, असे ते म्हणाले. नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी तियात्रवरील जीएसटी मागे घेतला जाणार असल्याचे आश्वासन लोकांना दिले आहे. परंतु जीएसटी प्रकरणात राज्य सरकारला किती अधिकार आहेत त्यावरही बरेच काही अवलंबून आहे असे ते म्हणाले.
‘सुदिरसूक्त वाचले नाही’
माजी आमदार विष्णू वाघ यांच्यावर त्यांच्या सुदिरसूक्त या कवितासंग्रसासाठी गुन्हा नोंदविण्यात आल्याच्या प्रकरणात शांताराम नाईक यांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या तेव्हा त्यांनी अद्याप आपण सुदिरसूक्त वाचले नसल्याचे सांगितले. गुन्हा नोंदवून चार दिवस झाल्यानंतरही या प्रकरणात कॉंग्रेस पक्ष प्रतिक्रिया का व्यक्त करीत नाही असे विचारले असता कॉंग्रेस कोणत्याही प्रकरणात प्रतिक्रिया देण्यापासून पळ काढत नसल्याचे ते म्हणाले. सुदिरसूक्त पुस्तक आपण वाचणार आहे आणि नंतर निश्चितच प्रितिक्रिया देणार आहे असे त्यांनी सांगितले.