स्मार्ट सिटी पणजीकरांसाठी साडेसाती; माजी महापौर, नगरसेवक उदय मडकईकरांचा आराेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 16:05 IST2024-01-01T16:04:31+5:302024-01-01T16:05:25+5:30
स्मार्ट सिटी ही पणजीकरांसाठी लागलेली साडेसाती आहे. या स्मार्ट सिटीच्या नावाखाली दोघा जणांचा बळी गेला आहे.

स्मार्ट सिटी पणजीकरांसाठी साडेसाती; माजी महापौर, नगरसेवक उदय मडकईकरांचा आराेप
नारायण गावस, पणजी : स्मार्ट सिटी ही पणजीकरांसाठी लागलेली साडेसाती आहे. या स्मार्ट सिटीच्या नावाखाली दोघा जणांचा बळी गेला आहे. तसेच अनेक जण जखमी झाले आहेत. सरकारने या कामाविषयी याेग्य दखल घेणे गरजेचे आहे. पण कुणालाच याचे काही पडलेले नाही, असा आरोप पणजी महानगरपालिकेचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला. साेमवारी पहाटे स्मार्ट सिटीच्या कामाच्या खड्ड्यात पडून युवकाचा मृत्यू झाल्याने त्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. उदय मडकईकर म्हणाले, गेली ७ वर्षे ९०० कोटी खर्च करुन स्मार्ट सिटीचे कामे सुरु आहे. पण पणजीत कुठलीच योग्य असे काम झालेले दिसत नाही. कंत्राटदार पैसे घेउन घरी बसून आहे. ठिकठिकाणी खाेदकामामुळे रस्त्यावर असे माेठे खड्डे पडले आहेत. कुठेच योग्य फलक तसेच लाेकांना अलर्ट करण्यासाठी कुठेच बेरीकेटस् घातले नाही. हा लोकांच्या जीवाशी खेळ आहे. या अगोदर असेच अनेक गाड्या खड्ड्यात पडून अनेकजण जखमी झाले आहेत. तरीही यावर काहीच दखल घेतली जात नाही.
सर्व नगरसेवक शांत :
मी गेल्या अनेक वर्षापासून स्मार्ट सिटीच्या कामावरुन आवाज उठवित आहे. पण महानगर पालिकेचा कुठलाच नगरसेवक मला पाठिंबा देत नाही. नगरसेवकांना आपल्या प्रभागामध्ये स्मार्ट सिटीची कशी कामे सुरु आहे हे ही माहीत नाही. आज जर हे नगरसेवक या दुय्यम दर्जाच्या कामाविरोधात एकत्र आले नाहीतर तर पुढे आणखी असेच बळी जाणार आहे. त्याचा नगरसेवकांनी आतातरी विचार करायला पाहिजे. मी या स्मार्ट सिटीच्या कामाविषयी खास बैठक घेण्याची मागणी गेले अनेक दिवस महापौरांकडे करत आहोत, असे उदय मडकईकर म्हणाले.