सिगल प्रकरणात एसआयटीचे आरोपपत्र
By Admin | Updated: November 18, 2014 02:07 IST2014-11-18T02:04:58+5:302014-11-18T02:07:27+5:30
फसवणुकीचे व पुरावे नष्ट करण्याचे आरोप

सिगल प्रकरणात एसआयटीचे आरोपपत्र
पणजी : खाण खात्याच्या नावाने बोगस कागदपत्रे बनविण्याच्या प्रकरणात सिगल् ओर कॅरियर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सीआयडीच्या विशेष तपास पथकाने सोमवारी सीबीआय न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
सिगल् कंपनीचे संचालक रेग्मिन्टन आंताव आणि महम्मद उस्मान शेख यांच्यावर फसवणुकीचा आणि पुरावे नष्ट करण्याचे आरोप एसआयटीकडून ठेवण्यात आले आहेत. एसआयटीच्या २८५ पानी आरोपपत्रात १५ साक्षिदाराच्या साक्षी नोंदविल्या आहेत.
सिगल् कंपनीचे संचालक रेग्मिन्टन आंताव आणि महम्मद उस्मान शेख यांनी खाण खात्याच्या नावाने बोगस कागदपत्रे करून ती
वास्को येथील एका बँकेला सादर केली. ती कागदपत्रे सादर करून फार मोठे कर्ज घेण्याचा त्यांचा डाव
होता.
कंपनीकडे ८० हजार मेट्रिक टन लोह खनिज आहे आणि ते निर्यात करण्यासाठी खाण खात्याला रॉयल्टीही फेडण्यात अली आहे, अशी माहिती त्यांनी बँकेला दिली होती. त्यासाठी बँकेच्या नावाने एक बोगस पत्रही तयार केले होते.
आरोपींनी दिलेली कागदपत्रे बँकेच्या अधिकाऱ्यांनी खात्री करून घेण्यासाठी खाण खात्याकडे पाठविली असता खाण खात्याने ती कागदपत्रे खात्याकडून देण्यात आली नव्हती, असे सांगितले आणि त्यामुळे आरोपींचा डाव फसला.
खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी एसआयटीकडे या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात संशयितांना अटकही करण्यात आली होती.
(प्रतिनिधी)