श्रीराम सेना कार्यालयाला गोव्यात परवानगी नाही
By Admin | Updated: July 31, 2014 02:25 IST2014-07-31T02:24:54+5:302014-07-31T02:25:39+5:30
पणजी : गोव्यात प्रमोद मुतालिक यांना श्रीराम सेनेचे कार्यालय उघडण्यास परवानगी देणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.

श्रीराम सेना कार्यालयाला गोव्यात परवानगी नाही
पणजी : गोव्यात प्रमोद मुतालिक यांना श्रीराम सेनेचे कार्यालय उघडण्यास परवानगी देणार नसल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.
आमदार विष्णू वाघ यांच्या अतारांकित प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी हे उत्तर दिले होते; परंतु अशाच स्वरूपाचा आणखी एक प्रश्न आलेक्स रेजिनाल्ड यांनी सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाला उपस्थित केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. रेजिनाल्ड यांचा प्रश्न स्पष्ट होत नव्हता त्यामुळे त्यांनी विचारलेल्या मुतालिक संंबंधी प्रश्नावर वेगळे उत्तर देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले.
बिकिनी संस्कृतीविषयी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या संबंधी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी रेजिनाल्ड यांनी केली. त्यावर गोव्यात कुठेही वेशाच्या मुद्द्यावरून कुणाचीही सतावणूक होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी सर्व मंत्र्यांनी घ्यावीत, अशा सूचना आपण केल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्याचे जबाबदार मंत्री एखादे वक्तव्य करतात आणि ते वैयक्तिक वक्तव्य असल्याचे सांगतात; परंतु यामुळे संसदेपर्यंत हा मुद्दा पोहोचला हे आमदार विजय सरदेसाई यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. दीपक ढवळीकर यांनी केलेले हिंदू राष्ट्र संबंधीचे वक्तव्य सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली; परंतु ती मंजूर करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)