श्रीराम नवमी विशेष: प्रभू श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 13:30 IST2025-04-06T13:30:31+5:302025-04-06T13:30:59+5:30
रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध श्रृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो.

श्रीराम नवमी विशेष: प्रभू श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य
श्री विष्णूचा सातवा अवतार श्रीरामाच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. चैत्र शुद्ध नवमीला रामनवमी असे म्हणतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, मध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असताना अयोध्येत रामचंद्राचा जन्म झाला. कित्येक राममंदिरांतून चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून नऊ दिवस हा उत्सव चालतो. रामायणाचे पारायण, कथाकीर्तन आणि राममूर्तीला विविध श्रृंगार अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो.
नवमीच्या दिवशी दुपारी रामजन्माचे कीर्तन होते. मध्यान्हकाळी, कुंची घातलेला एक नारळ पाळण्यात ठेवून तो पाळणा हलवतात. भक्तमंडळी त्यावर गुलाल आणि फुले उधळतात. श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी 'श्रीराम जय राम जय जय राम।' हा नामजप जास्तीत जास्त करावा. धर्माच्या सर्व मर्यादा पाळणारा अर्थात् 'मर्यादापुरुषोत्तम', आदर्श पुत्र, आदर्श बंधू, आदर्श पती, आदर्श मित्र, आदर्श राजा, आदर्श शत्रू असा सर्वार्थाने आदर्श ठरेल असा एकमेव 'श्रीराम'! आदर्श राज्याला आजही रामराज्याचीच उपमा देतात.
श्रीरामाची वैशिष्ट्ये आणि कार्य रामाने आई-वडिलांच्या आज्ञांचे पालन केले; पण प्रसंगी वडीलधाऱ्यांनाही उपदेश केला आहे. उदा. वनवासप्रसंगी आई-वडिलांनाही त्याने 'दुःख करू नका' असे सांगितले. ज्या कैकयीमुळे रामाला १४ वर्षे वनवास घडला त्या कैकयीमातेशी वनवासाहून परतल्यावर प्रेमाने वागला, बोलला.
आजही आदर्श बंधूप्रेमाला राम-लक्ष्मणाची उपमा देतात. श्रीराम एकपत्नीव्रती होता. सीतेचा त्याग केल्यावर विरक्तपणे राहिला.
रामाने सुग्रीव, विभीषण इत्यादींना संकटकाळात मित्राप्रमाणे मदत केली. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्त केल्यावर वैयक्तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्नीचा त्याग केला. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ विभीषणने नकार दिला, तेव्हा रामाने त्याला सांगितले, "मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे."
श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या; म्हणूनच त्याला 'मर्यादापुरुषोत्तम' म्हणतात. श्रीराम एकवचनी होता, श्रीरामाचा एकच बाण लक्ष्य वेधीत असल्याने त्याला दुसरा बाण मारावा लागत नसे. सुग्रीवाने रामाला विचारले, "बिभीषण शरण आल्यावर तुम्ही त्याला लंकेचे राज्य दिले. (युद्धाला सुरुवात होण्यापूर्वीच रामाने तसे सांगितले होते.) आता रावण शरण आला, तर काय करणार ?" त्यावर राम म्हणाला, "त्याला अयोध्या देईन. आम्ही सर्व भाऊ जंगलात राहायला जाऊ. स्थितप्रज्ञता हे उच्च आध्यात्मिक पातळीचे लक्षण आहे. श्रीरामाची स्थितप्रज्ञावस्था पुढील श्लोकावरून लक्षात येते.
प्रसन्नता न गतानभिषेकतः तथा न मम्ले वनवासदुःखतः । मुखाम्बुजश्री रघुनंदनस्य या सदास्तु मे मंजुल मंजुलमंगलप्रदा ॥
अर्थ : राज्याभिषेकाची वार्ता ऐकून ज्याच्यावर प्रसन्नता उमटली नाही आणि वनवासाचे दुःख पुढे उभे राहिले असतानाही ज्याच्यावर विषण्णता पसरली नाही, ती श्रीरामाची मुखकांती आमचे नित्यमंगल करो.
गीतेच्या परिभाषेत यालाच 'न उल्हासे, न संतापे। त्याची प्रज्ञा स्थिरावली ॥' त्रेतायुगात एकटा श्रीराम सात्त्विक होता असे नाही, तर प्रजाही सात्त्विक होती; म्हणूनच रामराज्यामध्ये एकही तक्रार श्रीरामाच्या दरबारात आली नव्हती.
संकलन- तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था