भाजपला धक्का: जिल्हा अध्यक्षालाच अटक; सरकारच्या कृतीबाबत पक्षात चिंता व संतापही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2024 12:03 IST2024-12-06T12:02:26+5:302024-12-06T12:03:29+5:30
भाजपच्या जिल्हा अध्यक्षाला भाजप सरकारच्याच सूचनेवरून अटक होते, असे सहसा देशात कुठेच कधी घडत नाही. मात्र गोव्यात हा प्रकार तुलनेने एका साध्या कारणावरून घडल्याने पक्षाला धक्काच बसला आहे.

भाजपला धक्का: जिल्हा अध्यक्षालाच अटक; सरकारच्या कृतीबाबत पक्षात चिंता व संतापही
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: भाजपच्या जिल्हा अध्यक्षाला भाजप सरकारच्याच सूचनेवरून अटक होते, असे सहसा देशात कुठेच कधी घडत नाही. मात्र गोव्यात हा प्रकार तुलनेने एका साध्या कारणावरून घडल्याने पक्षाला धक्काच बसला आहे. पक्षाचे अनेक जबाबदार पदाधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. पोलिसांनी सरकारच्या सूचनेवरून अटक केली हे लक्षात आल्याने भाजपमध्ये त्याविषयी चिंता व संतापही व्यक्त होत आहे.
तुळशीदास नाईक हे पंच सदस्य म्हणून निवडून येतातच, शिवाय ते भाजपचे जिल्हा स्तरावरील अध्यक्ष आहेत. भुतानीचा वादग्रस्त प्रकल्प हा तुळशीदास नाईक यांच्या प्रभाग क्षेत्रात येतो. त्यामुळे त्यांना लोकांसोबत अनेकदा आंदोलनात भाग घ्यावा लागतो. शिवाय पंचायतीच्या बैठकीतही आवाज उठवावा लागतो. पंचायत सचिवाने मोठ्या आवाजाने बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवावे अशी मागणी तुळशीदास नाईक यांनी केली होती. त्यांना पोलिस तक्रारीनंतर अटक झाली. मात्र आम्हाला वरूनच सूचना आल्याने अटक करावी लागली, असे पोलिस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सांगतात अशी चर्चा भाजपच्या आतील गोटात पसरली आहे.
याबाबत काहीजणांनी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंपर्यंतही विषय पोहचवला आहे. जे आर्थिक घोटाळे करतात, त्यांना अटक होत नाही, पण बैठकीत सचिवाशी थोडा वाद झाला तर अटक केली जाते, अशी चर्चा मुरगाव तालुक्यातही सुरू आहे. पेडणेत सनबर्नविरुद्ध भाजपचे आमदार आंदोलन करतात म्हणून आमदारालाही अटक केली जाईल काय असा प्रश्न भाजपच्याच प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये चर्चेत आला आहे.
पंचायतीच्या बैठकीत 'मिनिट बूक' फेकले!
सांकवाळ पंचायतीची बैठक चालू असताना पंच तुळशीदास नाईक यांनी इतिवृत्त नोंदपुस्तक फेकून दिले आणि आपल्या कामात व्यत्यय निर्माण केला अशी तक्रार पंचायत सचिव ऑर्विल वालिस यांनी वेर्णा पोलिस स्थानकावर केली. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रकरणात गुन्हा नोंद करून तुळशीदास नाईक यांना अटक केली. बुधवारी हा प्रकार घडला. वेर्णा पोलिसांनी बुधवारी रात्री तुळशीदास नाईक यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, संकवाळ पंचायत सचिव ऑर्विल वालिस यांनी बुधवारी पोलिस स्थानकावर तुळशीदास यांच्याविरुद्ध तक्रार केली.
या तक्रारीनुसार बुधवारी पंचायतीची पंधरावड्याची बैठक चालू असताना नाईक यांनी ऑर्विल यांच्याकडे असलेले इतिवृत्त पुस्तक खेचून घेतले आणि फेकून दिले. त्याची दखल घेत वेर्णा पोलिसांनी तुळशीदास यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या २२१ कलमाखाली आणि पीडीपीपी कायद्याच्या ३ कलमाखाली गुन्हा नोंद करून बुधवारी रात्री अटक केली. नंतर न्यायालयाने जामिनावर सुटका केली. पंच तुळशीदास नाईक दक्षिण गोवा भाजप अध्यक्ष आहेत. वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक निखिल देसाई तपास करीत आहेत.