सरस्वतीमुळेच शिरोडा विद्येचे माहेरघर: मंत्री सुभाष शिरोडकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 09:30 IST2025-10-09T09:29:17+5:302025-10-09T09:30:08+5:30
शिरोड्यात बाल घुमट आरती वादन स्पर्धेचे उद्घाटन

सरस्वतीमुळेच शिरोडा विद्येचे माहेरघर: मंत्री सुभाष शिरोडकर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : शिरोडा मतदारसंघाला श्री सरस्वती देवीचा आशीर्वाद लाभल्यामुळेच हा मतदारसंघ विद्येचे माहेरघर बनले आहे, असे प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.
बोरी - खार्जोडा येथील सार्वजनिक श्री सरस्वती उत्सवाच्या पहिल्या बाल घुमट आरती वादन स्पर्धेचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री शिरोडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पंचायत सदस्य दीपक तिरू नाईक बोरकर, बोरीचे सरपंच जयेश नाईक, पंच किरण सूरज नाईक, उत्सव समिती अध्यक्ष प्रितेश बोरकर, सरोजा बोरकर, परीक्षक कृणाल पारपती व रितेश नाईक आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते समई प्रज्वलित करून उद्घाटन व बाल घुमट आरती वादन स्पर्धेच्या चषकांचे अनावरण केले. यावेळी सर्व पाहुण्यांचे उत्सव समितीतर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
जयेश नाईक यांनी उत्सव समिती बरोबर संस्थापकांचे स्मरण करून या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. जिल्हा पंचायत सदस्य दीपक तिरू नाईक बोरकर यांनी उत्सव समितीचे अभिनंदन केले व सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शेवटी उद्घाटन समारंभाचे आभार प्रवीण नाईक बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा बोरकर यांनी केले. स्वागत प्रितेश बोरकर यांनी केले.
मतदारसंघावर देवीची कृपा
शिरोडा मतदारसंघावर श्री सरस्वती देवीने मुक्त हस्ताने विद्येची उधळण केल्यामुळे आयुर्वेदिक महाविद्यालय, होमिओपॅथी महाविद्यालय, श्री कामाक्षी रायेश्वर उच्च अभियांत्रिकी महाविद्यालयातील अशी मोठमोठी विद्यालयांची स्थापना झाली आहे. त्याचबरोबर निरंकाल बेतोडा, खार्जोड बोरी येथील सर्वात जुनी श्री सरस्वती देवीची स्थापना करून मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सव साजरा करतात. त्याची नोंद आयोजकांनी ठेवून पुस्तक स्वरूपात दस्तऐवज म्हणून जतन करून ठेवला पाहिजे, असे शिरोडकर म्हणाले. तसेच मतदारसंघातील विविध विकासकामांवरही चर्चा करण्यात आली आहे.