गोवा, तुझे सलाम!
By Admin | Updated: July 8, 2014 01:20 IST2014-07-08T01:12:58+5:302014-07-08T01:20:33+5:30
पणजी : गोव्यात सहृदय माणसांची आणि दात्यांची वानवा नाही. वेळ येताच दुरितांचे तिमिर दूर करण्यासाठी हजारो हात येथे सरसावतात.

गोवा, तुझे सलाम!
पणजी : गोव्यात सहृदय माणसांची आणि दात्यांची वानवा नाही. वेळ येताच दुरितांचे तिमिर दूर करण्यासाठी हजारो हात येथे सरसावतात. अनेक इतिहासदत्त घटना याला साक्ष आहेत. याच सहृदय दातृत्वाचा प्रत्यय ‘लोकमत’ला आज आला.
काणकोण तालुक्यातल्या एका गरीब मच्छीमार कुटुंबातल्या शुभम पागीचे वृत्त ‘लोकमत’ने शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केले. परिस्थितीचे चटके सहन करत; पण निर्धाराने त्याच परिस्थितीवर मात करत बिट्स पिलानीच्या राजस्थानस्थित केंद्रात प्रवेश मिळण्याची किमया साध्य केलेल्या शुभमची धडपड प्रसिद्ध करताना या गुणी आणि धडपड्या मुलाचा पुढचा मार्ग सुकर व्हावा हीच
मनीषा होती आणि ही मनीषा अवघ्या दोन दिवसांत सुफळ झाली.
दुसरा दिवस उजाडला तोच ‘लोकमत’च्या संपादकांना आलेल्या असंख्य फोनसह. शुभमची चौकशी करणारे, त्याच्याप्रती सहानुभूती व्यक्त करत त्याला मदतीचा हात देण्याचे अभिवचन देणारे हे फोन अव्याहतपणे येतच राहिले. गोव्याचा हा गुणी मुलगा शिक्षणापासून वंचित राहाणार नाही याची नि:संदिग्ध ग्वाही देत त्याच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची ग्वाही देणारे हे फोन घेताना गोव्याच्या अंत:करणात वसणारी मायेची ऊब जाणवली नाही तरच नवल!
जसजसा दात्यांचा संपर्क वाढला तसा ‘लोकमत’ने एक निर्णय घेतला. या प्रकरणात केवळ एक संवाहकाची भूमिका बजावण्याचा. गोव्यात वसणारी माणुसकी आणि शुभमसारख्या जिद्दी विद्यार्थ्यामधल्या सौहार्दाचे संवाहक होताना ‘लोकमत’ने शुभम पागी आणि त्याचे वडील रामदास यांना पणजी कार्यालयात पाचारण केले. शुभमच्या पुढच्या वाटचालीस साहाय्य करण्याचे, अगदी राजस्थान येथील त्याचे संपूर्ण शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठीशी राहाण्याचे वचन देणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही दात्यांनाही निमंत्रित केले.
या वेळी एका छोटेखानी सोहळ्यात शुभमच्या जिद्दीचे कौतुक केले आणि त्याच्या हितैषींशी त्याची गाठ घालून दिली. शुभमचे आई-वडील आणि आपल्या हातून होणाऱ्या समाजकार्याचा किंचितही बभ्रा होऊ नये, अशी अट घालणारे हितैषी यांचा परिचय घडवत ‘लोकमत’ने अशाच अनामिक
दात्यांनी दिलेली रक्कमही शुभमच्या हवाली केली.