पगारवाढ, मातृत्व रजा अन् सेवेत कायम, कर्मचाऱ्यांना सरकार देणार बळ: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 13:00 IST2025-03-05T13:00:34+5:302025-03-05T13:00:53+5:30
साखळी येथे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

पगारवाढ, मातृत्व रजा अन् सेवेत कायम, कर्मचाऱ्यांना सरकार देणार बळ: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून ३ हजार ते ५ हजार रुपये वेतनवाढ लागू केली जाईल. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा जीएसटी सरकार भरेल, तसेच चांगली पार्श्वभूमी असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कालावधीनंतर दोन वर्षांत कायम केले जाईल, अशा महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल केल्या. महिला कर्मचाऱ्यांना सहा महिने भरपगारी मातृत्व रजा दिली जाईल, असेही सावंत यांनी जाहीर केले.
साखळी येथे गोवा मनुष्यबळ विकास महामंडळाच्या वर्धापनदिन कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष आमदार रुदोल्फ फर्नांडिस, व्यवस्थापकीय संचालक गुरुदास देसाई व इतर उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री म्हणाले की, वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये महामंडळामार्फत सुरक्षा रक्षक, शिपाई, स्टेनो, कारकून तसेच अन्य पदांवर अनेकजण काम करत आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. पोलिस, वन आणि अग्निशामक दलात या कर्मचाऱ्यांना १० टक्के राखीव जागा दिल्या जातील. या कर्मचाऱ्यांच्या दूरस्थ शिक्षणासाठी वार्षिक १० हजार रुपये शैक्षणिक शुल्क सरकार भरणार आहे.
बिनपगारी रजा घेऊन दोन वर्षांपर्यंत विदेशात जाऊन नोकरी करून परत येथे रुजू होण्याची संधीही कर्मचाऱ्यांना प्राप्त होईल. या कर्मचाऱ्यांना गृह कर्ज आणि बोनसही विचाराधीन आहे. येत्या अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केल्या जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या या कर्मचाऱ्यांची संख्या चार हजार आहे. २०२७ पर्यंत ती दुप्पट होऊन आठ हजारांवर पोचेल. या कर्मचाऱ्यांच्या पगारावर १८ टक्के जीएसटी लागतो. त्यामुळेच वेतन वाढवले जाईल.
संपकरींना इशारा...
एवढ्या सर्व सवलती सरकार देत असतानाही कोणी संप करण्याची भाषा करत असेल तर खबरदार. सर्वांनी प्रामाणिकपणा आणि सुरक्षितता अवलंबल्यास गोवा स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.
३ टक्के पगारवाढ
गोवा रिक्रूटमेंट अॅण्ड एम्पलॉयमेंट सोसायटीमार्फत भरल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली आहे. दर वर्षी ३ टक्के पगारवाढ देणारे परिपत्रक जारी झाले आहे.