स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:43 IST2025-07-14T09:42:08+5:302025-07-14T09:43:54+5:30

राज्यस्तरीय सर्वेक्षण :  नवी दिल्लीत गुरुवारी पुरस्कार वितरण.

sakhali municipality ranks first in cleanliness congratulations from cm pramod sawant | स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन

स्वच्छतेत साखळी नगरपालिका प्रथम; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून अभिनंदन

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: केंद्रीय गृहनिर्माण नगर मंत्रालयातर्फे देशभर करण्यात आलेल्या स्वच्छता सर्वेक्षणात गोवा राज्य पातळीवर साखळी नगरपालिका अव्वल ठरली आहे. या मंत्रालयाचा स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२४-२५ साखळी नगरपालिकेला जाहीर झाला आहे. त्याचे वितरण गुरुवारी (दि. १७) दिल्ली येथील उद्योग भवनात विशेष सोहळ्यात होणार आहे.

गेल्या वर्षीपासून हे स्वच्छ सर्वेक्षण सुरू होते. साखळी नगरपालिकेचे नवीन पालिका मंडळ स्थापन झाल्यानंतर, नगरपालिका क्षेत्र स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. माजी नगराध्यक्षा रश्मी देसाई यांच्या कार्यकाळातही साखळी नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत उत्कृष्टतेचा पुरस्कार पटकावला होता, तर या वर्षीही या नगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत अव्वल पुरस्कार प्राप्त झाला. विद्यमान नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी गेल्या वर्षी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविलेले आहे.

'हे' घटक ठरले प्रभावी

रस्त्या शेजारी, तसेच खुल्या जागेत असणारा कचरा कमी व्हावा, स्वच्छतेच्या बाबतीत साखळी नगरपालिका क्षेत्रातील लोकांनीही सहकार्य करीत आपला भाग स्वच्छ राखण्यासाठी जागृती करण्यात आली होती. लोकांच्या घरातील ई-कचरा, जुने कपडे आणि इतरही कचरा योग्यपणे नगरपालिका कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी विशेष कृती हाती घेतली आहे. या अभियानाला साखळीतील नागरिकांनीही योग्य प्रतिसाद दिला असल्याने साखळी नगरपालिका क्षेत्रात कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे, हे सर्व निकष स्वच्छ सर्वेक्षणात प्रभावी ठरले.

सफाई कामगारांना श्रेय : नगराध्यक्षा

नगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे सर्व सहकारी नगरसेवक, तसेच विशेषतः साखळी स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कामगाराच्या कामाचे फलित आहे. पुरस्काराचे श्रेय हे पूर्णपणे याच सफाई कामगारांना जाते. या अभियानात नगरपालिकेने दिलेल्या हाकेला साखळीतील नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर ही मोहीम आतापर्यंत यशस्वी करण्यात यश आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असून त्यांचे मार्गदर्शन आणि सल्ला प्रत्येक कामात फायदेशीर ठरत आहेत. लोकांच्या अनेक समस्यांवर तोडगा काढण्यात ही नगरपालिका यशस्वी ठरत आहे, असे नगराध्यक्षा सिद्धी प्रभू यांनी या पुरस्काराबाबत सांगितले.

प्रत्येकाने जबाबदारीने स्वच्छता राखावी : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात मिळालेल्या पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे. स्वच्छ आणि सुंदर साखळीसाठी नगरपालिकेबरोबरच लोकांचाही सहभाग व सहकार्य आवश्यक आहे. वेळोवेळी आपण, तसेच नगरपालिकेनेही लोकांना दिलेल्या हाकेला लोकांनी सकारात्मक साथ दिली आहे. स्वच्छता ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असून, ही जबाबदारी जर प्रत्येकाने निभावल्यास साखळी शहर व नगरपालिका क्षेत्र भविष्यात कायम स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
 

Web Title: sakhali municipality ranks first in cleanliness congratulations from cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.