गोव्याला सुरक्षा कवच
By Admin | Updated: December 29, 2015 01:46 IST2015-12-29T01:46:15+5:302015-12-29T01:46:51+5:30
पणजी : नववर्षाचा आनंद घेण्यासाठी राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाल्यामुळे प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत

गोव्याला सुरक्षा कवच
पणजी : नववर्षाचा आनंद घेण्यासाठी राज्यात पर्यटकांचा ओघ सुरू झाल्यामुळे प्रशासनातर्फे सुरक्षेच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. पर्यटकांची झुंबड असलेल्या ठिकाणी सशस्त्र पोलिसांसह अतिरेकीविरोधी विभाग व राखीव पोलिसांनाही तैनात करण्यात आले आहे. वर्षसमाप्ती व नववर्षाच्या जल्लोषाला कोणत्याही प्रकारे गालबोट लागू नये, यासाठी प्रशासन झटत आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. ही शक्यता गृहीत धरूनच सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. रेंगनाथन यांनी सांगितले. आवश्यक त्या ठिकाणी टेहळणी मनोरे उभारण्यात आले असून त्यावर सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत.
१०० किनारी पोलीस, ३५ पर्यटन विभागाचे पोलीस, ७० दहशतवादविरोधी विभागाचे पोलीस, आयआरबीचे जवान आणि राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. शिवाय पोलीस स्थानकांना महत्त्वाच्या ठिकाणी गस्त घालण्याचे काम देण्यात आले आहे. गोव्यात ज्या धार्मिकस्थळांत पर्यटकांचा ओढा असतो, त्या स्थळांकडे गस्ती घालण्याचे काम सुरू झाले आहे. तसेच सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने चर्च व मंदिरांचा समावेश आहे. किनारी भागात आयआरबीचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पर्यटकांची पसंती असणारे व नेहमी गजबजलेले किनारे असलेले कळंगुट, हणजूण, कोलवा व पाळोळे या ठिकाणी सशस्त्र पोलीस ठेवण्यात आले आहेत. बॉम्ब डिफ्यूज स्कॉडही सतर्क करण्यात आले आहे, अशी माहिती रेंगनाथन यांनी दिली. (प्रतिनिधी)