'त्या' गोमंतकीयांची सुखरुप सुटका, मणिपूरमधून परतले; मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 16:10 IST2023-05-07T16:08:56+5:302023-05-07T16:10:14+5:30
मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

'त्या' गोमंतकीयांची सुखरुप सुटका, मणिपूरमधून परतले; मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : हिंसाचाराचा आगडोंब उसळलेल्या मणिपूरमध्ये अडकलेला ११ वर्षीय अर्णव कलंगुटकर शिक्षणासाठी गेलेली सुविद्या नाईक हे सुखरूप गोव्यात पोहोचले आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी तातडीने यंत्रणा गतिमान केल्यामुळे, या दोघांच्या सुरक्षित परतण्याचा मार्ग सुकर झाला.
पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव हा मणीपूर येथील बिश्नपूर या गावी आपल्या नातेवाइकांकडे सुट्टी घालविण्यासाठी गेला होता. मणीपूरमध्ये उसळलेला हिंसाचार हा या गावालाही बाधला असल्यामुळे, अर्णवच्या पालकांनी मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे मदतीची विनंती केली होती. मुख्यमंत्र्यांनी डीजीपी सिंग यांच्यामार्फत अर्णवला गोव्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.
गोवा पोलिसांनी त्या गावात असलेल्या सीआरपीएफला संपर्क करून, अर्णवला विमानतळावर सुरक्षित आणण्यासाठी मदत मागितली. मात्र, ते गावच हिंसाचारग्रस्त असल्यामुळे तेथून त्याला बाहेर काढणेही जोखमीचे होते. त्यामुळे अर्णवला काही काळ तिथेच राहू देण्याचा निर्णयही प्रारंभी झाला, परंतु पालक चिंता करू लागल्यामुळे त्याला आणायचे असे ठरले. सीआरपीएफच्या तुकडीनेच अर्णवला सुरक्षितपणे इंफाळमधील विमानतळापर्यंत नेले. तिथे एक अडकून पडलेल्या आणि गोव्यात येण्यासाठी निघालेल्या गोमंतकीयांच्या स्वाधीन त्याला करण्यात आले. इंफाळहून दिल्ली आणि दिल्लीहून गोवा असा प्रवास करून ते सुखरूप गोव्यात पोहोचले. सुविद्या नाईक हीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे सुरक्षितपणे गोव्यात पोहोचली.