रशियन पर्यटकांची गोव्याकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 04:25 PM2019-02-22T16:25:28+5:302019-02-22T16:29:51+5:30

रशियन पर्यटकांसाठी गोवा हे महागडे पर्यटन क्षेत्र ठरत असल्यामुळे त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर दिसून आला आहे. आतापर्यंत ज्या रशियन पर्यटकांवर गोव्यातील पर्यटनाचा तंबू उभा होता त्या रशियन पर्यटकांनीच गोव्याकडे पाठ फिरवली आहे.

Russian charter arrivals drop by over 50% | रशियन पर्यटकांची गोव्याकडे पाठ

रशियन पर्यटकांची गोव्याकडे पाठ

Next
ठळक मुद्देरशियन पर्यटकांसाठी गोवा हे महागडे पर्यटन क्षेत्र ठरत असल्यामुळे त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर दिसून आला आहे. ज्या रशियन पर्यटकांवर गोव्यातील पर्यटनाचा तंबू उभा होता त्या रशियन पर्यटकांनीच गोव्याकडे पाठ फिरवली आहे. मागच्या पर्यटन मौसमाच्या तुलनेत यंदा रशियन चार्टरच्या संख्येत 50 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव - रशियन पर्यटकांसाठी गोवा हे महागडे पर्यटन क्षेत्र ठरत असल्यामुळे त्याचा परिणाम गोव्याच्या पर्यटनावर दिसून आला आहे. आतापर्यंत ज्या रशियन पर्यटकांवर गोव्यातील पर्यटनाचा तंबू उभा होता त्या रशियन पर्यटकांनीच गोव्याकडे पाठ फिरवली आहे. मागच्या पर्यटन मौसमाच्या तुलनेत यंदा रशियन चार्टरच्या संख्येत 50 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.

ऑक्टोबर 2018 ते 28 जानेवारीपर्यंत रशियातून गोव्यात 169 चार्टर विमाने आली असून त्यातून 54,924 पर्यटक आले आहेत. त्या तुलनेत 2017-18 या मौसमात रशियाहून 1,15,213 पर्यटक आले होते. यंदा रशियन पर्यटकात झालेली घट पाहून पर्यटन व्यावसायिकांना 2015-16 च्या मौसमाची आठवण येऊ लागली असून त्या मौसमात गोव्यात रशियाहून फक्त 63,273 पर्यटकच आले होते.  त्यावर्षी रशियन रुबलची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घसरल्याने त्याचा विपरित परिणाम गोव्याच्या पर्यटनावर जाणवला होता.

गोवा हे पर्यटनासाठी महागडे ठरत असल्यामुळेच रशियन पर्यटक दुसरीकडे जात आहेत अशी माहिती गोवा ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष सावियो मसाईस यांनी दिली. ते म्हणाले, गोव्यातील विमानतळावरील शुल्क अधिक असून त्याशिवाय पर्यटकांना जीएसटीचाही भरुदड बसत असल्यामुळे हे पर्यटक गोव्यात येण्याऐवजी दक्षिण पूर्व आशियात किंवा इजिप्त किंवा टर्की या देशात जाऊ लागले आहेत.

गोव्यात येण्यासाठी रशियन पर्यटकांना दोन महिन्याच्या व्हिसासाठी दरडोई 100 डॉलर शुल्क भरावे लागते. लहान मुलांसाठीही हे शुल्क लागू आहे. रशियन पर्यटकांना हाताळणाऱ्या पेगास टुरिस्टीक या आस्थापनाचे व्यवस्थापक बाटीर आगीबायेव्ह हे म्हणाले, वास्तविक रशियन  पर्यटक जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी पर्यटनासाठी गोव्यात येत असून मात्र त्यांना दोन महिन्यांच्या व्हिसाचे शुल्क भरावे लागते. त्यामानाने व्हिएतनाम, इजिप्त व टर्की या देशात जाण्यासाठी त्यांना कुठलाही व्हिसा शुल्क भरावा लागत नाही. एवढेच नव्हे तर तेथील हॉटेलचा खर्चही गोव्याच्या मानाने बराच कमी असून पर्यटकांसाठी खास पॅकेजेस या देशात दिले जातात.

गोव्यात आतापर्यंत येणाऱ्या विदेशी पर्यटकांमध्ये रशियनांची संख्या सर्वात मोठी असायची त्या पाठोपाठ ब्रिटीश पर्यटकांचे गोवा हे आवडते ठिकाण होते. रशियन पर्यटकांच्या संख्येत घट झाली असली तरी ब्रिटीश पर्यटकांच्या संख्येत फारसा बदल झालेला नाही. त्या तुलनेत युक्रेनहून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे ही त्यातल्या त्यात पर्यटन व्यावसायिकांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मागच्या मौसमात युक्रेनहून गोव्यात 9,771 पर्यटक आले होते. यंदा ही संख्या 28,717 एवढी झाली आहे. असे जरी असले तरी युक्रेन हा लहान देश असल्याने रशियन पर्यटक न येण्यामागे जी पोकळी निर्माण झाली आहे ती युक्रेनच्या पर्यटकांमुळे भरुन येणे अशक्य असे मासाईस म्हणाले.

Web Title: Russian charter arrivals drop by over 50%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.